Dhananjay Munde Uddhav Thackeray News: प्रकृतीच्या कारणामुळे राजीनामा दिला आहे, असे धनंजय मुंडे सांगत आहेत. मग, फोटो-व्हिडीओ समोर आलेले असूनही सरकारने धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेतला नाही? मुख्यमंत्र्यांचे हात कुणी बांधत आहे का? असे प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला घेरले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विधिमंडळात उद्धव ठाकरे आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. धनंजय मुंडे यांनी आजारापणामुळे राजीनामा दिला आहे. सरकारकडे हे फोटो आधीपासूनच आले होते, तर आधीच राजीनामा का घेतला गेला नाही? असे ठाकरे म्हणाले.
व्हिडीओ सरकारकडे आधी आले होते की नव्हते?
मुंडेंच्या राजीनाम्यावर ठाकरे म्हणाले, "धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल शिवसेनेच्या (यूबीटी), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) आमदारांनी बोलून झालं आहे. सर्वांना हाच प्रश्न पडलेला आहे की, जे व्हिडीओ आणि फोटो काल आले. हे आधी सरकारकडे आले होते की नव्हते? हा महत्त्वाचा प्रश्न आहे."
"हळूहळू विषय पुढे येत जातील. दररोज भानगडी बाहेर येताहेत. मला वाटतं की, मुख्यमंत्री जर पारदर्शी कारभार करत असतील, तर त्यांचं स्वागत आहे. पण, पारदर्शीपणाने कारभार करताना त्यांचे हात कुणी बांधतंय का? हा सुद्धा एक प्रश्न आहे", अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली.
फडणवीसांनी उत्तर दिलं पाहिजे, ते स्वतः गृहमंत्री आहेत -ठाकरे
संतोष देशमुख हत्येचे फोटो मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आधीच आले होते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्याबद्दल उद्धव ठाकरे म्हणाले, "या प्रश्नाचं उत्तर स्वतः मुख्यमंत्र्यांनीच द्यायला पाहिजे. कारण ते स्वतः गृहमंत्री पण आहेत. प्रश्न योग्य आहे. कारण डिसेंबरपासून ही घटना गाजतेय", असे भाष्य ठाकरेंनी केले.
"धनंजय मुंडे यांनी जो राजीनामा दिला आहे, त्यांनी स्वतः कारण दिलं आहे; त्यांच्या तब्येतीचं. मी त्यांच्या तब्येतीबद्दल कोणतंही भाष्य करू इच्छित नाही, कारण कुणाच्या तब्येतीबद्दल चेष्टा करू नये. जशी माझ्या प्रकृतीबद्दल केली गेली होती. मी संस्कार पाळणारा आहे, त्यामुळे तब्येतील बद्दल बोलणार नाही, पण नेमकं खरं कारण काय?", असा सवालही ठाकरेंनी उपस्थित केला.
सरकारने राजीनामा का घेतला नाही?
"धनंजय मुंडे म्हणाले प्रकृतीमुळे राजीनामा दिला. अजित पवार म्हणाले नैतिकतेच्या मुद्द्यावर दिला. जर त्यांनी प्रकृतीच्या कारणामुळे दिला असेल, तर इतके फोटो, व्हिडीओ बाहेर आल्यानंतरही त्यांचा राजीनामा का घेतला गेला नाही? याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे", असे ठाकरे म्हणाले.