Anil Parab on Chhatrapati Sambhaji Maharaj: छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारीत छावा चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही या चित्रपटाचा उल्लेख झाला. मात्र आता ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार अनिल परब यांनी छावा चित्रपटाला अनुसरुन केलेल्या विधानाने नवा वाद उफाळून आला आहे. अनिल परब यांनी स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांसोबत केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. विधानपरिषदेत बोलताना अनिल परब यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर जसे अत्याचार झाले, तसेच माझ्यावरही झाले असं विधान केलं. त्यांच्या या विधानावरुन भाजपचे आमदार आक्रमक झाले असून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरु केलं आहे. अनिल परब यांना निलंबित करा अशी मागणी भाजप आमदारांकडून करण्यात आली.
विधानपरिषेदत राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होत असताना आमदार अनिल परब यांनी छावा चित्रपटाचा उल्लेख केला होता. मुख्यमंत्र्यांनी सहकाऱ्यांसह छावा चित्रपट पाहिला. पण राज्यपालांच्या अभिभाषणात छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख आढळला नाही, असं अनिल परब म्हणाले. त्यानंतर अनिल परब यांनी त्यांची तुलाना छत्रपती संभाजी महाराजांसोबत झालेल्या छळासोबत केली. यावरुनच सत्ताधारी भाजप आमदार आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार प्रसाद लाड, चित्रा वाघ, प्रवीण दरेकर यांनी आंदोलन करत अनिल परब यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.
काय म्हणाले अनिल परब?
"धर्म बदलण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांचा छळ झाला. माझ्यावर पक्ष बदलण्यासाठी छळ झाला. मी सगळे भोगले, पण पक्ष बदलला नाही. बाकी सर्वांना जरा हूल दिली की, लगेच पक्ष सोडून गेले. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल सत्ताधारी बाकावरून बरेच बोलले गेले. धर्म बदलण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला. त्यांचे डोळे काढले, हात-पाय छाटले. छत्रपती संभाजी महाराजांनी शेवटपर्यंत धर्म बदलला नाही. छत्रपती संभाजी महाराजांचा वारसा मी चालवला आहे. पक्ष बदलण्यासाठी माझाही छळ झाला. ईडीची नोटीस, सीबीआय अशा वेगवेगळ्या कारवाया माझ्यावर करण्यात आल्या. पण मी पक्ष बदलला नाही, याचा मला अभिमान वाटतो. आता जे पक्ष बदलून गेलेत तेच आता आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचा वारसा सांगत आहे," अशी टीका अनिल परब यांनी केली.