गुजरातमध्ये भाजपा जिंकणार हे उद्धव ठाकरेंना नाही पटलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2017 17:28 IST2017-12-16T17:22:46+5:302017-12-16T17:28:18+5:30
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्याच्या मतदानानंतर विविध वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल घेऊन वर्तवलेला अंदाज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अजिबात पटलेला नाही.

गुजरातमध्ये भाजपा जिंकणार हे उद्धव ठाकरेंना नाही पटलं
मुंबई - गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्याच्या मतदानानंतर विविध वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल घेऊन वर्तवलेला अंदाज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अजिबात पटलेला नाही. प्रत्यक्ष गुजरातमधलं वातावरण आणि एक्झिट पोलचा अंदाज यामध्ये खूप फरक आहे असे उद्धव यांचे मत आहे.
गुजरातमध्ये 14 डिसेंबरला दुस-या टप्प्याचे मतदान पार पाडल्यानंतर लगेचच विविध वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोलचे अंदाज जाहीर केले. सर्व वाहिन्यांच्या एक्झिट पोल्सनी 182 जागा असलेल्या गुजरात विधानसभेत भाजपा स्पष्ट बहुमत मिळवेल असे म्हटले आहे. पण एक्झिट पोलचा हा अंदाज उद्धव यांना मान्य नाही. स्वत: शिवसेनाही गुजरातच्या रणसंग्रामात असून शिवसेनेने 40 पेक्षा जास्त जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.
चाणक्यचा एक्झिट पोल -
भाजपाला 135 जागा ( 11 जागा कमी किंवा जास्त) कॉंग्रेसला 47 जागा ( 11 जागा कमी किंवा जास्त) आणि इतरांना 0 ते 3 जागांची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हिमाचलमध्ये झालेल्या निवडणुकांबाबतही चाणक्यचा पोल आला असून यामध्ये भाजपाला पूर्ण बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 68 जागांपैकी भाजपाला 55 जागा ( 7 जागा कमी किंवा जास्त ), कॉंग्रेसला 13 जागा (7 जागा कमी किंवा जास्त) आणि इतरांना 3 जागांची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
2014 च्या लोकसभा निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आलेल्या विविध एक्झीट पोलपैकी फक्त चाणक्यचा एक्झीट पोल सर्वात जवळ ठरला होता. एनडीएला 340 जागा मिळतील असा अंदाज सर्वात पहिले केवळ चाणक्यने वर्तवला होता. याच वर्षी उत्तर प्रदेश निवडणुकांचा अंदाज देखील चाणक्यच्या पोलचा खरा ठरला होता.
उत्तर प्रदेशमध्ये चार एक्झिट पोल्सनी भाजपा उत्तरप्रदेशात सर्वात मोठा पक्ष ठरेल पण उत्तरप्रदेश विधानसभा त्रिशंकू राहील असा अंदाज व्यक्त केला होता, पण भाजपा पूर्ण बहुमताने सत्तेत येईल असं चाणक्यने आपल्या पोलमध्ये म्हटलं होतं. त्यामुळे चाणक्यच्या पोलकडे सर्वांचं लक्ष लागून होतं.