BLOG: उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणानंतर 'मातोश्री'वरचा फोन खणाणला, अन्...

By मोरेश्वर येरम | Published: October 16, 2021 03:07 PM2021-10-16T15:07:18+5:302021-10-16T15:08:50+5:30

CM Uddhav Thackeray: दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर 'मातोश्री'वर फोन खणाणला अन् एका शिवसैनिकाला संवाद साधण्याची संधी मिळाली...

uddhav thackeray dasara melava speech shivsainik phone call to cm | BLOG: उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणानंतर 'मातोश्री'वरचा फोन खणाणला, अन्...

BLOG: उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणानंतर 'मातोश्री'वरचा फोन खणाणला, अन्...

googlenewsNext

- मोरेश्वर येरम

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल दसरा मेळाव्यात शिवसैनिकांना संबोधित केलं. उद्धव ठाकरेंनी आपल्या ५३ मिनिटं ३० सेकंदाच्या भाषणात बहुतांशवेळ विरोधकांवर किंबहुना भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच "मी राज्याचा मुख्यमंत्री आहे असं मला कधीच वाटू नये. माझ्या जनतेलाही तसं वाटू नये. कारण त्यांना मी त्यांच्या घरातला वाटलो पाहिजे. त्यांचा भाऊ वाटलो पाहिजे", असं म्हटलं. उद्धव ठाकरेंनी जनतेला दिलेल्या याच अधिकारवाणीतून एका शिवसैनिकाला उद्धव ठाकरेंना थेट फोन करुन आपलं मनोगत मांडण्याची संधी मिळाली तर?.... नेमकं काय म्हणतोय शिवसैनिकात दडलेला सामान्य नागरिक? 

( उद्धव ठाकरेंच्या कालच्या भाषणानंतर 'मातोश्री'वर फोन खणाणला)

"हॅलो...साहेब जय महाराष्ट्र! साहेब कालचं भाषण खूप जोरदार झालं. तुम्ही आमच्याच कुटुंबातील सदस्य असल्याचं आपुलकीनं सांगितलंत म्हणूनच थेट फोनचा रिसिव्हर उचलून तुमच्याशी संवाद साधण्याचं धाडस केलं. ज्या आपुलकीनं तुम्ही बोलता ते ऐकून खूप बरं वाटतं. सध्याचा कोरोनाचा काळ लक्षात घेता घाबरवण्यापेक्षा काळजी करणं खूप गरजेचं होतं. ती आपुलकी आणि काळजी तुमच्या बोलण्यात नक्कीच सर्वांना मिळाली यात काहीच शंका नाही. पण साहेब मी शिवसैनिक असलो तरी मूळ सामान्य नागरिक आहे. या जाणीवेतून काही अपेक्षा मनात आहेत आणि त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत असं मनोमन वाटत होतं.  कुटुंबप्रमुखापासून काय लपवून ठेवायचं. त्यामुळे सारं काही मनमोकळेपणानं बोलतो. 

कोरोनानं सगळी घडी विस्कटलेली असताना राज्य कारभार हाकणं नक्कीच काही सोपी गोष्ट नाहीय. पण साहेब त्यातलं आम्हाला काही कळत नाही. इथं पोटाला दोनवेळचं जेवण मिळतंय पण कमाई खूप आटली गेलीय. त्याचं काहीतरी झालं पाहिजे. धारावीत रोजगार निर्माण करण्यासंदर्भात तुम्ही बोललात, आंतरराष्ट्रीय मत्स्यालय, कोस्टल रोड हे सारं काही तुम्ही सांगितलंत. ते नक्कीच होईलही यात शंका नाही. पण साहेब मला वाटतं मुंबईची चिंता करु नका. मुंबईत माझ्यासारखा शिवसैनिक जोवर तुमच्या पाठिशी आहे तोवर कसलीच चिंता नाही. पण आता आपल्याला काळजी करण्याची गरज आहे ती लोकांवर आलेल्या निर्बंधांची अन् जीवनशैलीत आलेल्या बदलाला जुळवून घेण्यासाठी त्यांना अपेक्षित साथ देण्याची. परिस्थितीशी जुळवून घेण्याचा माणसाचा गुणधर्मच आहे. पण ते जुळवून घेत असताना माणसाला दिला गेलेला आधार तो कधीच विसरत नाही. त्यामुळे आता राजकारण, निवडणुका यापेक्षा कोरोनानंतरच्या युगाशी सर्वसामान्य माणूस जुळवून घेण्याच्या प्रक्रियेतून जातोय. ती अधिक सुकर कशी होईल यावर भर दिला जावा अशी प्रामाणिक अपेक्षा आहे. साहेब शेवटी अपेक्षा अशाच व्यक्तीकडे बोलून दाखवली जाते की ज्याच्याकडून पूर्ण होण्याची खात्री आपल्याला असते. त्यामुळेच इतकं दिलखुलासपणे तुमच्याशी बोलू शकतोय. काही चुकलं तर माफ करा. 

साहेब थेट प्रशासकीय भूमिकेत येण्याची तुमची पहिलीच वेळ असली आणि कोणताही अनुभव गाठीशी नसला तरी त्याची काही आता गरज आहे असं वाटत नाही. राजकीय टोले-टीका यात तुम्ही अडकून पडावं असं वाटत नाही. सामान्य माणसाला आता तुम्हाला कोण काय म्हणतं आणि तुम्ही कुणाला काय प्रत्युत्तर देता याच्याशी घेणंदेणं राहिलेलं नाही. इतर राजकीय नेत्यांच्या गोतावळ्यातून तुम्ही ठसठशीतपणे वेगळेपण सिद्ध करावं अशी आम्हा सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. 

शेतकऱ्यांचे प्रश्न आजवर प्रत्येक राजकीय नेत्यानं मांडले आहेत आणि वारेमाप पॅकेजेसची घोषणाही झालीय. तरी आजही प्रश्न कायम आहेत. ते सोडवले गेले तर नक्कीच तुम्ही इतरांपेक्षा वेगळे ठराल आणि प्रत्येक शिवसैनिकाला याचा अभिमान वाटेल. तुमच्यावर प्रशासनाच्या नेतृत्त्वासोबतच पक्षाच्या नेतृत्त्वाचीही धुरा आहे याची कल्पना आहे. त्यामुळे राजकीय जीवनात अनेक घटनांना तोंड द्यावं लागतं. आपल्याही पक्षात असे हेवेदावे आणि मतभेदांना सोडविण्यात तुमचं कसब पणाला लागत असेल याची कल्पना आहे. ज्या हिमतीनं तुम्ही पक्षाची एकजूट कायम ठेवली आहे. ती यापुढेही कायम राहील. पण माझ्यासारख्या शिवसैनिकामागे एक सामान्य नागरिकच दडलाय. सामान्य नागरिक जगला, वाढला तर शिवसैनिक वाढेल, पक्ष वाढेल. त्यामुळे साहेब तुम्ही राजकीय टीका-टिपण्णीपासून जितकं बाजूला राहता येईल तितकं बाजूला राहावं. थोडं कठीण आहे. पण सद्यपरिस्थितीत तेच खूप महत्त्वाचं वाटतंय.

बंद झालेले उद्योग सुरू होणं, आर्थिक गाडी रुळावर येणं, कोविड आधीच्या जगातील सुसह्यपणा पुन्हा आमच्या जगण्यात यावा असं मनोमन वाटतं. ते करण्यात जर तुम्ही यशस्वी झालात तर ते आपल्या कुटुंबप्रमुखाचं यश असेल. कुटुंब रुळावर येऊ द्यात साहेब. मग महाराष्ट्रही रुळावर येईल. बाकी राजकारणाची बारमाही वेल बहरत राहणारच आहे. तिला पाणी देण्याचं काम माझ्यासारखा शिवसैनिक अविरत करत राहिल. यात कोणतीही शंका नसावी. जय महाराष्ट्र साहेब!"

Web Title: uddhav thackeray dasara melava speech shivsainik phone call to cm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.