व्यापाऱ्यांनी चालवलेले राज्य आता पेंढाऱ्यांचे बनले, उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 07:49 AM2018-12-13T07:49:32+5:302018-12-13T07:49:50+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे.

Uddhav Thackeray criticized Modi in samna | व्यापाऱ्यांनी चालवलेले राज्य आता पेंढाऱ्यांचे बनले, उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका

व्यापाऱ्यांनी चालवलेले राज्य आता पेंढाऱ्यांचे बनले, उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका

Next

मुंबईः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. हे राज्य व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यांसाठी चालवले व आता ते पेंढाऱ्यांचे राज्य बनले. पाचपैकी एकाही राज्यात मोदी व शहा विजय मिळवू शकले नाहीत. कारण जनतेला व्यापारी नको आहेत, असं मत सामना संपादकीयमधून व्यक्त करण्यात आलं आहे. राहुल गांधी यांनी विजय नम्रपणे स्वीकारला. पण मोदी तर पंडित नेहरू, इंदिरा गांधी व राजीव गांधींचे देश उभारणीतील योगदान मानायला तयार नाहीत. भाजप उभारणीतले लालकृष्ण आडवाणी व इतर कुणीच त्यांना मान्य नाहीत. असा अहंकार फक्त महाभारतात दिसला होता, पण त्याचाही पराभव झाला, असं म्हणत सामनातून मोदींना लक्ष्य करण्यात आलं आहे.  राहुल गांधी यांनी नम्रतेने सांगितले, ‘आम्ही भाजपचा 2019 मध्येही पराभव करू, पण भाजपमुक्त हिंदुस्थानचा नारा देणार नाही.’ इतक्या वादळातही गांधी का टिकले व इतके घाव सोसूनही लोकशाही का नष्ट झाली नाही याचे उत्तर त्याच विनम्रतेत असल्याचंही सामनाच्या अग्रलेखातून अधोरेखित करण्यात आलं आहे.

सामना संपादकीयमधील महत्त्वाचे मुद्दे

- राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होणे म्हणजे महात्मा गांधी यांचे काँग्रेस बरखास्तीचे स्वप्न पूर्ण करण्यासारखेच आहे अशी टीका तेव्हा मोदी-शहांसारख्या दिग्गजांपासून ते भाजपातील गल्लीबोळातील पोरेटोरेही करीत असे.

- राहुल गांधी यांनी त्यांच्या घरात घुसून मारले आहे. काँग्रेसला जे श्रद्धांजली वाहताना थकत नव्हते ते सगळे अचानक मूकबधिर झाले आहेत. 

- मोदी हे विष्णूचा तेरावा अवतार तर शहा हेच मूळ चाणक्य आहेत. त्यामुळे पुढची शे-पाचशे वर्षे या दोन शूरवीरांचा पराभव होणार नाही आणि हे दोन वीर पुनः पुन्हा अवतार घेत राहतील व राज्य करतील असे त्यांच्या भक्तांना वाटत होते. 

-  आमच्या देशात तेहतीस कोटी देव आहेत व देवही एकमेकांशी ‘सत्य धर्म’ यासाठी लढत होते हे भक्तगण विसरले. पाच राज्यांत जे महाभारत घडले त्यात पांडव कोण, कौरव कोण या फंदात आम्हाला पडायचे नाही, पण अन्याय आणि असत्याचा पराभव झाला. 

- 2014 नंतर संस्कृती व विनम्रता देशातून नष्ट झाली. ज्यांनी पक्ष घडवला ते अडगळीत गेले. ज्या मित्राने संकटकाळात साथ दिली ते शत्रू ठरवले गेले. ज्या जनतेने तुम्हाला धुळीतून शिखरावर नेले त्याच जनतेचा कडेलोट झाला. 

- काँग्रेस राजवटीत काही गोष्टींचा अतिरेक झाला तेव्हा इंग्रज परवडले अशी तीव्र भावना लोकांत निर्माण झाली. आता काँग्रेस परवडली असे लोकांना वाटू लागले आहे. 

- चार राज्यांतील पराभव हा मोदींचा पराभव नसल्याचे आता सांगितले जाते. चुकीचे तिकीट वाटप व स्थानिक नेतृत्वामुळे पराभव झाला अशी कारणेही पुढे केली जात आहेत. मग आतापर्यंत मिळालेले विजयांचे श्रेय स्थानिक नेत्यांना कितीदा दिले?

- प्रत्येक राज्यात मोदी व शहा यांनी चाळीस चाळीस सभा घेऊन काँग्रेस व राहुल गांधी यांना लाथा घातल्या. पंतप्रधान पदावरील व्यक्तीने किती खालच्या पातळीवर जाऊन बोलावयाचे याचे भान ठेवले नाही. 

- नोटाबंदीपासून ते 95 वर्षांच्या आईचा मुद्दा प्रचारात येतो व त्यावर भावनिक बोलून मते मागितली जातात. लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मोदी हे प्रचारात उतरले नसते तर हा पराभव स्थानिक नेतृत्वाचा व अंतर्गत तिकीट घोटाळ्याचाच ठरला असता. 

- हा पराभव पंतप्रधानांचाच आहे. त्यांनी तो आता विनम्रतेने स्वीकारला. त्यातही अहंकार आहे. त्यांनी मोठ्या विजयाबद्दल राहुल गांधींचे अभिनंदन केले नाही. 

- संसदेत राहुल गांधी यांनी मोदी यांना आलिंगन दिले तेव्हा ‘ही काय जबरदस्ती?’ असे गोंधळलेले भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. कोण राहुल गांधी? असे त्यांना वाटले. 

- कोण गांधी, कोण बादल, कोण ठाकरे, कोण जनता? सर्वकाही मी आणि मीच आहे. त्या मीपणाचा पराभव शक्तिमान जनतेने केला. 

-  थट्टा आणि अहंकाराचा अतिरेक होतो तेव्हा जनता नरसिंहाचा अवतार घेते. मतपेटीतून हा नरसिंह बाहेर येतो तसा तो पाच राज्यांत आला. धडा घ्यावा असे निकाल लागले, पण धडा घेण्याची इच्छा आहे काय?

Web Title: Uddhav Thackeray criticized Modi in samna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.