Join us
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा कार्यकर्त्यांनी स्वत:च्या आईला विचारावं की...; उद्धव ठाकरेंनी उडवली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 14:30 IST

मी हा गृहमंत्री कलंक आहे असं मी आता म्हणणार नाही. पण तो कसा आहे हे सांगायचे काम तुम्हाला करायचे आहे अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता केली.

मुंबई – अंधभक्त समजू शकतो, परंतु ज्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली ती काढा. चौकशी करायची तर सगळ्यांची करा, देशभरात सर्वांची करा. पण मुंबई महापालिकेला, मुंबादेवीला, मुंबाआईच्या नावाने स्थापन झालेल्या शहराला तिच्या यंत्रणेला बदनाम करू नका. अजिबात करू नका. आपले काम जनतेपर्यंत पोहचवा. भाजपाची थोतांडे उघडी पाडावीच लागतील त्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही असा कानमंत्र उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला. होऊ दे चर्चा या शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते.

यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपा कार्यकर्त्यांची त्यांच्या शैलीत खिल्ली उडवली. उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपाने त्यांच्या कार्यकर्त्यांना कार्यक्रम दिलाय, घरघर मोदी..मी त्यांचे स्वागत करतो. परंतु भाजपाच्या कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती की या कार्यक्रमाची सुरुवात स्वत:च्या घरापासून करा. स्वत:च्या आईला विचारा, आई उज्ज्वला योजनेमुळे आपल्या घरात किती सिलेंडर मिळाले. आज डाळीचा भाव काय आहे गं. मग बाबांना विचारा, बाबा तुम्हाला पगारवाढ झाली का? भाऊ,बहिण तुमची मुले असतील त्यांच्या शिक्षणाची सोय झाली का? घरात नळ असेल तर पाणी येते का? की नुसता आवाज येतो भाईओ और बहनो.. काय सांगता येत नाही, विज्ञानाने इतकी झेप घेतलीय त्यामुळे नळ उघडल्यानंतरही आवाज येऊ शकतो असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

तसेच भाजपा कार्यकर्त्यांच्या सध्या संतरंज्या, पायघड्या झाल्या आहेत. मला त्यांच्याबद्दल आदर आहे. मी टिंगळ करत नाही, चेष्टा करत नाही आणि टोमणा तर अजिबात मारत नाही. मी पुन्हा एकदा कलंक बोलणार होतो. काल माझ्या माताभगिनींवर जे अत्याचार झाले ते पाहून तुम्ही गृहमंत्री कलंक नाही तर दुसरं काय हे मी बोलणार होतो. पण आता बोलत नाही. घराघरात पोलीस घुसून मारतायेत, बारसूला पोलीस अत्याचार झाला, वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाला. जालनात शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलनातील माताभगिनींना मारले त्यामुळे मी हा गृहमंत्री कलंक आहे असं मी आता म्हणणार नाही. पण तो कसा आहे हे सांगायचे काम तुम्हाला करायचे आहे अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता केली.

टॅग्स :उद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसभाजपा