Join us  

रामप्रभूंची अवस्था ‘आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना’ - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 7:41 AM

Ram Mandir :शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर विवादावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. 

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर विवादावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. ''जसजशा निवडणुका येत आहेत तसतसा रामाचा जप जोरात सुरू झाला आहे. आता तर सर्वोच्च न्यायालयाने अयोध्याप्रकरणी फारच पुढची तारीख दिली व याप्रश्नी रोजच्या सुनावणी घेण्याच्या तारखा लोकसभा निवडणुकांदरम्यान जाहीर झाल्या तरी आम्हांस आश्चर्य वाटणार नाही. याचदरम्यान स्वतः पंतप्रधान मोदी अयोध्येत जाऊन एखादी सभा घेतील व मंदिरप्रश्नी ‘मन की बात’ व्यक्त करतील. हे सर्व राजकारण कायमचे थांबावे म्हणून राममंदिरासाठी अध्यादेश काढाच व रामाला राजकारणातूनही मुक्त करा'', असे म्हणत त्यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. शिवाय, आम्ही 25 नोव्हेंबरला याचाच सोक्षमोक्ष लावण्यासाठी अयोध्येत निघालो आहोत, हे देखील सांगितले आहे.  सामना संपादकीयमधील ठळक मुद्दे - रामप्रभूंची अवस्था ‘आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना’ अशीच झाली आहे. सरकार राममंदिराची वीट रचत नाही आणि सर्वोच्च न्यायालय मंदिरप्रश्नी फक्त तारखांवर तारखा देत सुटले आहे. आता न्यायालयाने आणखी नवी तारीख दिली आहे. - राममंदिराचा प्रश्न न्यायालय सोडवू शकणार नाही. रामाला  कोर्टाच्या पिंजऱ्यात उभे करून अयोध्येत राममंदिर उभे राहणार नाही.  -  बाबरीचा ढाचा उद्ध्वस्त कसा झाला याचा शोध घेण्यासाठी सरकारने सीबीआय स्पेशल कोर्ट सुरू केले व ज्यांनी रामाचा वनवास संपविण्यासाठी बाबरी पाडली ते सर्व सज्जन सीबीआय कोर्टात आरोपी म्हणून आजही उभे आहेत. बाबरी पाडणाऱ्यांना आरोपी करून तुम्ही राममंदिर कसे बांधणार? - मुळात न्यायालयाचे असे निर्णय मानू नयेत असे भाजप नेत्यांचे म्हणणे असेल तर बाबरी प्रकरणाची चौकशी करणारे कोर्ट अद्याप का ठेवले आहे? त्या सीबीआयचा पाया आणि घुमटही आता कोसळून पडला आहे. - श्रीरामांचे भव्य मंदिर व्हावे व ते अयोध्येतच व्हावे असे मोदी यांना वाटत असेल तर न्यायालय व सगळ्यांच्या सहकार्याची तिकडमबाजी सोडून सरळ एक अध्यादेश काढायला हवा. आता यावर ‘‘अध्यादेश काढणे हे इतके सोपे आहे काय?’’ असे विचारले जात आहे; पण याआधी असे अध्यादेश निघाले नाहीत काय? हा आमचा प्रश्न आहे. - देशाला मोदीरूपी हिंदू राजा मिळाला असताना अयोध्येत राम आजही वनवासी का? याचे उत्तर कुणी देईल असे वाटत नाही. निवडणुका आल्या की, राममंदिराची आठवण होते व निवडणुका संपताच राम पुन्हा कडीकुलपात बंद! हे आता तरी थांबावे. -  आम्ही 25 नोव्हेंबरला अयोध्येत निघालो आहोत ते याचाच सोक्षमोक्ष लावण्यासाठी.

टॅग्स :राम मंदिरउद्धव ठाकरेनरेंद्र मोदीअयोध्या