Devendra Fadnavis Uddhav Thackeray: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामांना स्थगिती देण्याच्या मुद्द्यावरून डिवचलं होतं. विधानसभेत बोलताना फडणवीसांनी केलेल्या या विधाना रविवारी (९ मार्च) उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले. 'अहो, तुम्ही उद्धव ठाकरे होऊच शकत नाही. मालकाच्या मित्राचे खिसे भरणाऱ्या कामांना नुसती स्थगिती नाही, तर ठामपणे नकार द्यायला उद्धव ठाकरे पाहिजे", असा पलटवार ठाकरेंनी केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकारी आणि शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मुलुंडमधील कालिदास नाट्यगृहात झालेल्या या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
ठाकरे म्हणाले, 'ते फडणवीसारख्या येरा गबाळ्याचे काम नाहीये'
उद्धव ठाकरे म्हणाले, "देवेंद्र फडणवीस काल-परवा बोलले... कशाचा काही संबंध नाही. कामांना स्थगिती द्यायला मी काय उद्धव ठाकरे आहे का? अहो, तुम्ही उद्धव ठाकरे होऊच शकत नाही. हेच तर तुमचं दुःख आहे. कारण माझ्या राज्याचं नुकसान होऊन मालकाच्या मित्राचे खिसे भरणाऱ्या कामांना नुसती स्थगिती नाही, तर ठामपणे नकार द्यायला उद्धव ठाकरे पाहिजे, ते देवेंद्र फडणवीसारख्या येरा गबाळ्याचे काम नाहीये", असा टोला ठाकरेंनी फडणवीसांना लगावला.
ठाकरेंनी फडणवीसांना काय दिलं चॅलेंज?
"देवेंद्रजी, तुम्हाला उद्धव ठाकरे व्हायचं असेल, तर उद्या अर्थसंकल्प जाहीर होतोय. जसे मी माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती. तशी तुम्ही उद्या माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवा. मी माझ्या वचन नाम्यातील पहिलं वचन, गोरगरिबांना दहा रुपयात शिवभोजन जाहीर केलं होतं. तुम्ही माझ्या महाराष्ट्रातील माताभगिनींना २१०० जाहीर करून दाखवा आणि मग माझ्या बरोबरी करा", असे आव्हान ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना दिले.
सरकार राहिले असते, तर काम रद्द केलं असतं -उद्धव ठाकरे
"मी कोणत्या कामांना स्थगिती दिली होती? आरे कॉलनीतील वृक्षतोडीला स्थगिती दिली होती. सरकार राहिलं, तर ते मी रद्द करून कांजूरला आता तुम्ही अदानीच्या घशात जागा घातलीये, तिकडे मेट्रोचे स्थानक करून दाखवलं असतं", असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.