Join us

"एकनाथ शिंदे वाटच बघच आहेत"; संजय गायकवाड मारहाण प्रकरणावर उद्धव ठाकरे म्हणाले, "CM च्या बदनामीसाठी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 17:04 IST

उद्धव ठाकरे यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या मारहाणीबद्दल बोलताना शंका उपस्थित केली. 

Uddhav Thackeray on MLA Sanjay Gaikwad: आमदार निवासातील कँटिनमधल्या जेवणावरुन शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या मारहाणीचे प्रकरण जोरदार चर्चेत आहे. आमदार निवासातील कँटिनमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्यावरुन बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे पडसाद पावसाळी अधिवेशनातही उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना लोकप्रतिनिधीने मारहाण करणे चुकीचे असल्याचे म्हटलं. अशातच उद्धव ठाकरे यांनी या घटनेमागे षडयंत्र असल्याचे म्हटलं आहे.

मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासमध्ये बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. संजय गायकवाड यांनी कँटिनमधून खोलीमध्ये जेवण मागवलं होतं. मात्र कँटिनमधून पाठवण्यात आलेली डाळ निष्कृष्ट दर्जाची होती आणि तिचा वास येत होता. त्यानंतर संतापलेले संजय गायकवाड कँटिनमध्ये गेले आणि डाळीचा वास घेऊन बघ असं म्हणत त्यांनी कर्मचाऱ्याच्या कानशि‍लात लगावली. गायकवाड यांनी बुक्क्यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या मारहाणीबद्दल बोलताना शंका उपस्थित केली. 

"तो आमदार माझ्या पक्षाचा असू शकत नाही. तो एसंशि गटाचा आहे. पण त्यांचे काहीतरी सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बदनामी करण्यासाठी त्याचे षडयंत्र सुरु आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अॅटिंना सुरु ठेवले पाहिजेत. असं कोणी वागत असेल तर त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी सक्त कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. करतात की नाही हे थोड्या  दिवसात कळेल. नाहीतर मी असं म्हणेन की मुख्यमंत्र्यांचे त्याला पाठबळ आहे. ही शिवसेना स्टाईल नाही आणि मुळात ते शिवसैनिक नाहीत," असं उद्धव ठाकरे म्हणाले.

"जाणूनबुजून हे असले प्रकार सुरु आहेत. याच्यामागे मला एक षडयंत्र दिसत आहे. कारण एकनाथ शिंदे यांचा दावा होता की ते मुख्यमंत्री होणार आहेत. ते मुख्यमंत्री नाही झाले. त्यामुळे ते वाटच बघच आहेत," असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं. 

मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

"मी संजय गायकवाडांचा तो व्हिडीओ बघितला आणि त्याबद्दल माहितीदेखील घेतली आहे. अशा प्रकारचे वर्तन आपल्या कुणासाठीही भूषणावह नाही. यामुळे विधिमंडळाची, आपल्या सगळ्यांची आणि आमदारांची प्रतिष्ठा, प्रतिमा कमी होते. आमदार निवासामध्ये काहीही अनियमितता असेल तर त्याबाबत तक्रार करून कारवाई करता येते. पण अशाप्रकारे लोकप्रतिनिधीने मारहाण करणे आणि त्याचे व्हिडिओ समोर येणे चुकीचे आहे. यामुळे लोकांमध्ये चुकीची भावना जाते," अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

टॅग्स :विधानसभाउद्धव ठाकरेसंजय गायकवाडएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीस