“मला अनेक धक्के दिले, पण आपण एकच मोठा धक्का देऊ की ते पुन्हा दिसता कामा नयेत”: उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 17:08 IST2025-02-20T17:05:47+5:302025-02-20T17:08:13+5:30
Uddhav Thackeray News: अनेक धक्के बसत असल्याने मी आता धक्का पुरुष झालो आहे. कोण किती धक्के देत आहे, ते बघूया. विधानसभेला झालेली चूक पुन्हा होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

“मला अनेक धक्के दिले, पण आपण एकच मोठा धक्का देऊ की ते पुन्हा दिसता कामा नयेत”: उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray News: मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, पुणे, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासह राज्यभरातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत असल्याचे चित्र आहे. उद्धवसेनेचे माजी आमदार आणि अनेक पदाधिकारी पक्ष सोडून जात असल्याची चर्चा थांबविण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर आले आहेत. उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर नेत्यांशी चर्चा केली. महत्त्वाच्या नेत्यांना उद्धव ठाकरे यांनी चर्चा करण्यासाठी बोलावले होते. यानंतर आता खासदार, आमदारांसोबत स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. यानंतर आता उद्धव ठाकरेंनी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्धार केला आहे.
एकनाथ शिंदे यांनी ऐतिहासिक बंडखोरी करत थेट पक्षावर दावा सांगितला. भाजपासोबत सत्ता स्थापन करत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्हही एकनाथ शिंदेंना मिळाले. यानंतर विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी मोठी बाजी मारली. तर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. शिवसेनेत पडलेली मोठी फूट आणि ठाकरे गटाला लागत असलेली मोठी गळती यानंतर उद्धव ठाकरे महापालिका निवडणुकांना सामोरे जात आहेत. शिवसेनेतील फुटीनंतरही ही पहिलीच मुंबई महापालिका निवडणूक असणार आहे. मुंबईतील कुर्ला व कलिना मतदारसंघातील एका विभागाच्या विभागप्रमुखपदी सोमनाथ सापळे यांची नियुक्ती झाल्यानंतर पदाधिकारी व शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर गेले. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी उपस्थितांना संबोधित केले.
मला अनेक धक्के दिले, पण आपण एकच मोठा धक्का देऊ की ते पुन्हा दिसता कामा नयेत
उद्धव ठाकरे यांना धक्यावर धक्के बसत आहेत, पण आता मी धक्का पुरुष झालो आहे. कोण किती धक्के देत आहे, ते बघूया, यांना काय द्यायचा तो एकदाच धक्का देऊ. यावेळी असा देऊ की, हे पुन्हा दिसता कामा नये, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका एप्रिल किंवा मे महिन्यात लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे, सर्वांनी शाखेनुसार दिलेली कामे करावी. विधानसभेत जो अनुभव आला तो अनुभव लक्षात घेता जी चूक झाली ती आता चूक आता होणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.
दरम्यान, एखादा निर्णय घेतल्यानंतर थोडी फार नाराजी असते. ही लढाई एकट्या दुकट्याची नाही, ही लढाई आपली आहे. आपल्या मूळावर घाव घालणारे कसे सरसावलेत. आपल्याच लाकडाचा दांडा करून कुऱ्हाड तयार करत आपल्याच मूळावर आणि मराठी माणसावर घाव घालण्याचा प्रयत्न करत आहेत. संघटना बांधणीचे हे दिवस आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.