उद्धवसेनेच्या शिवदूतांचे मुंबईत ‘हर घर दस्तक’, उपशाखाप्रमुखांना सक्रिय करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 06:46 IST2025-01-15T06:44:00+5:302025-01-15T06:46:10+5:30

मुंबईतील ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मदतीने मतदारांशी संपर्क साधण्यात येणार आहे.

Uddhav Sena's Shivdoots 'Har Ghar Dastak' in Mumbai, will activate sub-branch chiefs | उद्धवसेनेच्या शिवदूतांचे मुंबईत ‘हर घर दस्तक’, उपशाखाप्रमुखांना सक्रिय करणार

उद्धवसेनेच्या शिवदूतांचे मुंबईत ‘हर घर दस्तक’, उपशाखाप्रमुखांना सक्रिय करणार

मुंबई : मुंबई महापालिका आगामी निवडणुकांसाठी उद्धवसेनेचे शिवदूत मतदारांच्या घरोघरी जाऊन संपर्क वाढविणार आहेत. मतदारांचे तीन विभागात वर्गीकरण करून गटप्रमुख, उपशाखाप्रमुखांना सक्रिय करण्यात येणार आहे. त्यांच्यामार्फत ‘हर घर दस्तक’ अभियान मुंबईत राबविण्यात येणार आहे.

पक्ष निरीक्षकांच्या अहवालानंतर उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील सर्व विभागप्रमुख, माजी नगरसेवक यांची बैठक घेतली. यावेळी स्वबळावर निवडणूक लढविण्याची इच्छा अनेक पदाधिकारी यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी महापालिकेसाठी कामाला लागण्याच्या सूचना नेत्यांना केल्या आहेत. तसेच, कामात कसूर करणाऱ्यांना तत्काळ बदलण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिल्याचे सुत्रांनी सांगितले.

विभाजन होणार
मुंबईतील ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मदतीने मतदारांशी संपर्क साधण्यात येणार आहे. वाढलेल्या नवीन मतदारांना भेटून महापालिकेसाठी त्यांनी पक्षाला मतदान का करावे, हे शिवदूत त्यांना समजावून सांगणार आहेत. शिवसेनेचा पारंपरिक मतदार, उद्धवसेनेच्या विरोधातील मतदार आणि कोणत्याही पक्षाची विचारधारा न मानणारे मतदार अशा विभागात मतदारांचे विभाजन करण्यात आले आहे. 

त्यांना पदावरून बाजूला करणार
विधानसभा निवडणुकीमध्ये विभागप्रमुख ते गटप्रमुख अशा पदाधिकाऱ्यांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या होत्या. मात्र, ज्यांनी आपले काम योग्य रीतीने केले नाही. ज्यांच्या तक्रारी पक्षाकडे आल्या आहेत, अशांना लवकरच पदावरून दूर केले जाणार आहे. त्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, असेही या सुत्रांनी सांगितले.

Web Title: Uddhav Sena's Shivdoots 'Har Ghar Dastak' in Mumbai, will activate sub-branch chiefs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.