उद्धवसेना ५० चा आकडाही गाठणार नाही, सांस्कृतिक कार्यमंत्री शेलार यांची भविष्यवाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 14:43 IST2025-05-19T14:42:39+5:302025-05-19T14:43:19+5:30
मुंबईत सध्या महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी एका मुलाखतीत निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार असल्याचा निर्वाळा दिला. त्यामुळे भाजप आणि शिंदेसेना वेगळे लढणार का? याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

उद्धवसेना ५० चा आकडाही गाठणार नाही, सांस्कृतिक कार्यमंत्री शेलार यांची भविष्यवाणी
मुंबई : महापालिका निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर नसली तरी भाजपने तयारीत आघाडी घेतल्याचे चित्र आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणूक भाजप-शिंदेसेना आणि अजित पवार गट हे महायुती म्हणून एकत्रित लढणार आहेत, असे सांगतानाच उद्धवसेना मुंबईत ५० चा आकडाही गाठणार नाही, अशी भविष्यवाणी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे.
मुंबईत सध्या महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी एका मुलाखतीत निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार असल्याचा निर्वाळा दिला. त्यामुळे भाजप आणि शिंदेसेना वेगळे लढणार का? याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
भाजप महायुतीचे नेतृत्व करेल. देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात शिंदे, पवार आणि आम्ही सगळे मिळून काम करू. त्यातही मुंबईकरांचं, मुंबईचं ठरलंय, भाजप, देवेंद्रजी आणि महायुतीसोबतच राहायचं. त्यामुळे मी आज भविष्यवाणी करतो की उद्धवजी यांची शिवसेना २२७ पैकी ५० चा आकडाही पाहणार नाही.
पक्षाची तयारी आणि मुंबईकरांना काय देणार याबाबत बोलताना शेलार म्हणाले, महापालिका निवडणुकीचं काउंटडाउन सुरू झालं आहे. बैठकांचं सत्र सुरू झालं आहे. प्रभागांचं विश्लेषण, आकडेवारी, होमवर्कही तयार झालं आहे. आता बिगुल वाजायची वाट बघत आहोत. पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या कामावर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत. अतिआत्मविश्वासात नाही, पण मुंबईकरांचं विकासाचं स्वप्न पूर्ण करणार आहोत. मुंबईच्या गरिबांसाठी तसेच करदात्यांना चांगल्या योजना आणि सेवा कशी मिळेल याची व्यवस्था करणार आहोत.
‘लक्ष्मीदर्शना’साठीच विरोध
आगामी महापालिका निवडणुकीत धारावी पुनर्वसन प्रकल्पाचा मुद्दा प्रचारात गाजण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या प्रश्नावर उद्धवसेना आणि भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या जोरदार फैरीही सुरू आहेत. भाजपने आता या विषयावर आक्रमक भूमिका घेत धारावी पुनर्वसन प्रकल्पाला उद्धवसेनेकडून होणारा विरोध हा केवळ राजकीय असूयेपोटी आणि ‘लक्ष्मीदर्शना’साठीच आहे, असा थेट आरोप केला आहे.
मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी एका मुलाखतीतदरम्यान सांगितले की, मुंबईच्या विषयावर उद्धवसेनेच्या कुठल्याही नेत्याने कुठल्याही स्तरावर चर्चा करण्यास यावे, आम्ही तयार आहोत.
उद्धवजी यांच्या डोक्यात नेहमी अदानी, अंबानी आणि मुंबईची जमीन हेच विचार असतात. सरकारची कंपनी धारावीचा पुनर्विकास करत आहे. त्यामधील एक शेअरहोल्डर अदानी आहेत. ते मुख्यमंत्री असताना या कंपनीला मान्यता देण्यात आली आहे. या कामाचे टेंडर महाविकास आघाडी सरकारच्या काळातच निघाले आणि पूर्वीचे टेंडर रद्द होण्यामागे जे सरकार होते, त्याचे तुम्ही भाग आहात, अशी आठवणही त्यांनी उद्धव ठाकरे यांना करून दिली.