उद्धवसेना - मनसेत सारे काही आलबेल; यशवंत किल्लेदार प्रभाग समिती अध्यक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 05:45 IST2026-03-07T05:45:29+5:302026-03-07T05:45:44+5:30
पालिकेच्या १७ प्रभाग समित्यांसाठी गुरुवारी पहिला टप्पा तर शुक्रवारी दुसरा टप्पा पार पडला. पहिल्या टप्प्यात सहा प्रभागांसाठी निवडणूक झाल्यानंतर, शुक्रवारी आणखी ६ प्रभागांसाठी निवडणूक पार पडली. भाजपला आतापर्यंत १७ पैकी एकूण सहा प्रभाग समितींचे अध्यक्षपद मिळाले आहे.

उद्धवसेना - मनसेत सारे काही आलबेल; यशवंत किल्लेदार प्रभाग समिती अध्यक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महापालिकेतील १७ पैकी आणखी सहा प्रभाग समित्यांसाठी शुक्रवारी निवडणूक पार पडली. त्यापैकी तीन प्रभाग समित्यांमध्ये उद्धवसेना - मनसेच्या युतीची सरशी झाली. तर उर्वरित तीन प्रभाग समितीचे अध्यक्षपद भाजपने मिळवले. दादर, माहिमचा समावेश असलेल्या जी उत्तर प्रभाग समितीमध्ये उद्धवसेनेच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यामुळे मनसेच्या यशवंत किल्लेदार यांची बिनविरोध निवड झाली. यामुळे मनसे - उद्धवसेनेत स्वीकृत नगरसेवकामुळे झालेला दुरावाही मिटल्याची चर्चा आहे.
पालिकेच्या १७ प्रभाग समित्यांसाठी गुरुवारी पहिला टप्पा तर शुक्रवारी दुसरा टप्पा पार पडला. पहिल्या टप्प्यात सहा प्रभागांसाठी निवडणूक झाल्यानंतर, शुक्रवारी आणखी ६ प्रभागांसाठी निवडणूक पार पडली. भाजपला आतापर्यंत १७ पैकी एकूण सहा प्रभाग समितींचे अध्यक्षपद मिळाले आहे.
मनसे कार्यकर्त्यांमध्ये होते नाराजीचे वातावरण
काँग्रेसला २, उद्धवसेनेला २ तर मनसे आणि एमआयएमला प्रत्येकी एका प्रभाग समितीचे अध्यक्षपद मिळाले आहे. पी दक्षिण प्रभाग समिती अध्यक्षपदी भाजपच्या श्रीकला रामचंद्रन पिल्ले, एच/पूर्व व एच/पश्चिम प्रभाग समिती अध्यक्षपदी उद्धवसेनेच्या रोहिणी कांबळे, के पश्चिम प्रभाग समिती अध्यक्षपदी भाजपचे रोहन शशिन्द्र राठोड, के उत्तर व के दक्षिण प्रभाग समिती अध्यक्षपदी भाजपचे प्रकाश दौलत मुसळे तसेच जी दक्षिण प्रभाग समिती अध्यक्षपदी उद्धवसेनेच्या पद्मजा चेंबूरकर यांचाच अर्ज दाखल झाल्यामुळे सर्वांची बिनविरोध निवड झाली. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून महापौर रितू तावडे व उपमहापौर संजय घाडी होते.
हे आहेत या प्रभाग समित्यांचे अध्यक्ष
जी उत्तर - दादर यशवंत किल्लेदार (मनसे)
जी दक्षिण - प्रभादेवी पद्मजा चेंबूरकर (उद्धवसेना)
के पश्चिम - अंधेरी रोहन राठोड (भाजप)
के दक्षिण व के उत्तर - जोगेश्वरी प्रकाश मुसळे (भाजप)
पी दक्षिण - गोरेगाव श्रीकला पिल्ले (भाजप)
एच पूर्व व एच पश्चिम रोहिणी कांबळे (उद्धवसेना)
मनसे कार्यकर्त्यांमध्ये होते नाराजीचे वातावरण
मनसेने उद्धवसेनेकडे एका स्वीकृत नगरसेवकाची मागणी केली होती. मात्र, उद्धवसेनेकडून तिन्ही जागांवर उद्धवसेनेचे नगरसेवक दिल्याने मनसे कार्यकर्ते नाराज होते. त्यामुळे उद्धवसेना व मनसेत फार काही आलबेल नसल्याची चर्चा होती. दादर जी उत्तर प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उद्धवसेनेचे नगरसेवक जोसेफ कोळी यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनीही अर्ज दाखल केला. दरम्यान, उद्धवसेना आणि मनसेतील चर्चेनंतर अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ऐनवेळी उद्धवसेनेचे जोसेफ कोळी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे किल्लेदार यांची बिनविरोध निवड झाली.