उद्धवसेनेचे ठाण्यातही शिव सर्वेक्षण; स्वबळाचा सूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 05:55 IST2025-01-28T05:54:59+5:302025-01-28T05:55:22+5:30
बैठकीत महानगरपालिका निवडणुकीसंदर्भातील तयारीचा उद्धव ठाकरेंनी आढावा घेतला.

उद्धवसेनेचे ठाण्यातही शिव सर्वेक्षण; स्वबळाचा सूर
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मातोश्री निवासस्थानी ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक घेतली. यावेळी पक्षाची ताकद अजमावण्यासाठी आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढविण्यात यावी, अशी भूमिका जिल्हा पदाधिकाऱ्यांनी मांडली. मुंबईप्रमाणे ठाण्यातही येत्या २ फेब्रुवारीपासून शिव सर्वेक्षण यात्रा सुरब करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाणे जिल्ह्यातील विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख आणि पदाधिकारी यांची उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी बैठक बोलावली होती.
पदाधिकाऱ्यांची मविआ नेत्यांविरोधात तक्रार
बैठकीत महानगरपालिका निवडणुकीसंदर्भातील तयारीचा त्यांनी आढावा घेतला. यानंतर ते विधानसभानिहाय आढावा बैठक घेणार आहेत, असे या सूत्रांनी सांगितले.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. मात्र, त्यावेळी महाविकास आघाडी असल्यामुळे पक्षाची ताकद किती ते आजमावता आले नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी योग्य सहकार्य केले नाही, अशी तक्रार पदाधिकाऱ्यांनी केली. त्यामुळे ठाणे जिल्ह्याबाबत काय भूमिका घ्यायची याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.