उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 06:45 IST2025-12-20T06:45:20+5:302025-12-20T06:45:54+5:30
उद्धवसेनेचे आ. अनिल परब यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शुक्रवारी शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेऊन अर्धा तास चर्चा केली.

उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धवसेना व मनसे नेत्यांची जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. काही जागांबाबत तिढा निर्माण झाल्याने त्याचा निर्णय दोन्ही पक्षप्रमुख घेणार आहेत. याचदरम्यान उद्धवसेनेचे आ. अनिल परब यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शुक्रवारी शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेऊन अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर परब यांनी मातोश्रीवर उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन राज यांच्यासोबत झालेल्या चर्चेची माहिती दिली.
उद्धवसेनेकडून आ. परब, आ. वरुण सरदेसाई तर मनसेकडून बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई हे चर्चा करीत आहेत. गेले काही दिवस दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावर सातत्याने बैठका होत आहेत. मात्र, काही जागांबाबत अद्याप दोन्ही पक्षांचे एकमत न झाल्याने युतीची घोषणा पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच, ही घोषणा पत्रकार परिषदेद्वारे करायची की संयुक्त मेळाव्याद्वारे यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे या मुद्द्यांबाबत आ. परब यांनी राज यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मनसे नेते नितीन सरदेसाई या भेटीबाबत म्हणाले, विजय मिळविणे अंतिम लक्ष्य आहे. त्यामुळे जागावाटपाच्या चर्चेत प्रत्येक प्रभागाचा विचार केला जात आहे.
शरद पवार यांचा प्रस्ताव
उद्धवसेना व मनसे युतीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. त्यांचा प्रस्ताव उद्धवसेनेकडे आला असेल तर त्याबाबत ते राज ठाकरे यांना कळवतील. तर, मुंबईत ठाकरे यांचे अस्तित्व आहे की नाही, अशी टीका करणाऱ्यांना त्याचे उत्तर १६ जानेवारीला मिळेल, असेही सरदेसाई म्हणाले.