मराठी माणसासाठी केलेले एक काम उद्धव-राज यांनी दाखवावे; मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 12:41 IST2025-10-31T12:31:41+5:302025-10-31T12:41:48+5:30
मुंबई महापालिकेत आजही ७९ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत, सगळ्या खर्च केल्या नाहीत

मराठी माणसासाठी केलेले एक काम उद्धव-राज यांनी दाखवावे; मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांची टीका
मुंबई : मुंबईत मेट्रो रेल्वे, कोस्टल रोड, बीडीडी चाळ पुनर्बाधणीसारख्या प्रकल्पांतील बाधित मराठी माणसांना मुंबईबाहेर जाऊ न देता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतच घरे दिली. मराठी माणूस कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरला मुंबईबाहेर गेला तो उद्धव ठाकरे यांच्या काळात. मनसे अध्यक्ष राज आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसासाठी २५ वर्षात केलेले एक तरी काम दाखवावे, अशी जोरदार टीका मुंबई भाजप अध्यक्ष व आ. अमित साटम यांनी केली.
आ. साटम यांनी गुरुवारी 'लोकमत'च्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी झालेल्या चर्चेत त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. प्रशासकीय कारभाराच्या काळात आमच्या सरकारने मुंबई महापालिकेवरील रस्त्यांच्या काम कामाच्या दर्जात सुधारणा केली. रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची ५० टक्के कामे पूर्ण झाली. मुंबईत मलजल प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी प्लांट) नव्हता. त्यासाठी दिल्लीहून सर्व मंजुऱ्या मिळवून या कामाच्या निविदा काढण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मुंबईच्या समुद्राचा रंग हा पुन्हा स्वच्छ निळा करायचा आहे, अशी ग्वाही साटम यांनी दिली.
महापालिकेच्या मुदत ठेवी ९३ हजार कोटी रुपये होत्या, त्यातील सात ते आठ हजार कोटी रुपयांच्या ठेवी मुंबईच्या पायाभूत सेवा उभारण्यासाठी मोडल्या तर त्यात गैर काय? असा सवाल करत, आजही ७९ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत, सगळ्या खर्च केल्या नाहीत, असे साटम म्हणाले.
मुंबईत महायुती महापालिकेच्या २२७ जागा लढणार असून, १५० पेक्षा अधिक निवडून आणण्याचे उद्दिष्ट आहे. मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होईल. मग तो भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी किंवा रिपाइं, अशा कोणत्याही पक्षाचा असेल. मात्र, तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'व्हिजन' आणि मुख्यमंत्री मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा व्यक्ती असेल, असे सावध उत्तर साटम यांनी दिले.
जागावाटपाबाबत बोलताना ते म्हणाले, स्थानिक लोकांच्या पसंतीचा पक्ष, व्यक्ती, संघटनात्मक ताकद, स्थानिक प्रश्नांना न्याय देणारा, अशा काही निकषांवर उमेदवार आणि जागावाटप होईल. भाजपचा कार्यकर्ता हा एका विचाराने प्रेरित असा आहे, तो सत्तेसाठी हपापलेला नाही. आम्ही आमच्या ८० टक्के कार्यकर्त्यांना न्याय देऊ. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते बंडखोरी करतील, अशी शक्यता त्यांनी फेटाळून लावली. तसेच जागावाटप कसे असेल, याचे चित्र हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर स्पष्ट होईल. ८० टक्क्यांपेक्षा अधिक उमेदवारी या सर्वेक्षणावर आधारित दिल्या जातात, असेही ते म्हणाले.
राज आणि उद्धव ठाकरे एकत्र लढले तरी काही फरक पडणार नाही. त्यांच्या एकत्र येण्याचे आकर्षण हे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येच असेल. मराठी माणसाला त्याचे अजिबात कौतुक नाही. १९९७ ते २०२२ अशी सलग २५ वर्षे महापालिकेची कारकीर्द जनतेने पाहिली आहे. त्यांची मुले बॉम्बे स्कॉटिश शाळेत शिकली आणि आमच्या मुलांना हे मराठी शाळेत घालायला सांगतात. त्यांच्या मुलांनी शाळेत जर्मन आणि फ्रेंच विषय घेतले आणि हे हिंदीला विरोध करतात. ही त्यांची ढोंगी आणि दुटप्पी भूमिका जनतेला कळली आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचा केंद्रबिंदूच उद्धव ठाकरे आहेत, असे साटम म्हणाले.
भाजपचा नव्हे, मुंबईकरांचा जाहीरनामा
भाजप शुक्रवारपासून मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क मोहीम सुरू करणार असून, त्यात घरोघरी, रेल्वे स्टेशन, महाविद्यालयीन विद्यार्थी, सेलिब्रिटी अशांना भेटून त्यांच्याकडून मुंबईबाबत सूचना मागवल्या जातील. त्यावर आधारित भाजपचा जाहीरनामा तयार करण्यात येईल. त्यामुळे हा भाजपचा नव्हे, तर मुंबईकरांचा जाहीरनामा असेल, असे अमित साटम यांनी सांगितले.
महापौर कोणाचा ?
महापौर महायुतीचाच होईल. भाजप-शिंदेसेना एकत्र लढतील. महापौर भाजपचा होईल की शिंदेसेनेचा ? असे विचारले असता साटम म्हणाले, कोणाचाही झाला तरी तो पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विचारानेच चालणारा असेल.