Join us

उद्धव ठाकरेंच्या महासभेला मुंबईतून 1 लाख शिवसैनिक जाणार पंढरपूरला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 09:02 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 24 डिसेंबरला रोजी पंढरपुरात जाहीर सभा होणार आहे. चंद्र भागातीरी होणाऱ्या विराट महासभेला मुंबईतील शिवसेनेच्या 227 शाखांमधून सुमारे 1 लाख शिवसैनिक जाणार असून या सभेसाठी शिवसेनेने राज्यातून सुमारे 5 लाखांचे टार्गेट ठेवले आहे. 

ठळक मुद्देउद्धव ठाकरे यांची 24 डिसेंबरला पंढरपुरात जाहीरसभा1 लाख शिवसैनिक पंढरपुरात दाखल

- मनोहर कुंभेजकरमुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 24 डिसेंबरला रोजी पंढरपुरात जाहीर सभा होणार आहे. चंद्र भागातीरी होणाऱ्या विराट महासभेला मुंबईतील शिवसेनेच्या 227 शाखांमधून सुमारे 1 लाख शिवसैनिक जाणार असून या सभेसाठी शिवसेनेने राज्यातून सुमारे 5 लाखांचे टार्गेट ठेवले आहे. पंढरपूर येथे मुंबईतून मोठ्या संख्येने येणाऱ्या शिवसैनिकांची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शिवसेनेच्या 12 विभाग प्रमुखांवर टाकली आहे. गेले आठ ते दहा दिवस शिवसेनेच्या 227 शाखांमधून शिवसैनिकांच्या सतत बैठका होत असून प्रत्येक शाखांमधून एक किंवा जास्त लक्झरी बसेस आणि अनेक खासगी वाहनांमधून शिवसैनिक मोठ्या संख्येने पंढरपूरला जाणार आहेत.  400 ते 500 बसेस आणि शेकडो वाहनांचे बुकिंग शिवसेनेकडून करण्यात आले केले आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या गेल्या 25 नोव्हेंबरच्या अयोध्या दौऱ्यात सहभाग नसलेली युवासेना आणि महिला आघाडीही पंढरपूरला मोठ्या संख्येने जाणार असल्याने त्यांच्यात उत्साह संचारला असल्याचे चित्र आहे. तर गोरेगाव विधानसभा मतदार संघातून युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर यांनी स्वतः 7 लक्झरी बसेसची व्यवस्था केली आहे.

दिंडोशी,गोरेगाव आणि जोगेश्वरी पूर्व या तीन विधानसभेची विभागप्रमुख म्हणून जबाबदारी असलेले शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद, आमदार सुनील प्रभू  आणि विभाग क्रमांक 4 व 5 चे विभागप्रमुख आमदार अॅड.अनिल परब, विभाग क्रमांक 1 चे विभागप्रमुख,आमदार विलास पोतनीस,विभाग क्रमांक 2 चे विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांच्या विभागातून हजारोंच्या संख्येने शिवसैनिक,युवासेना व महिला आघाडी सोमवारी 24 डिसेंबरला पहाटे 5 वाजता पंढरपूरला जाणार आहेत.

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आज दुपारी पंढरपूरला जाणार असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले. मुंबईतून हजारोच्या संख्येने शिवसैनिक पंढरपूरला येण्यासाठी मुंबईतील शिवसेनेचे मंत्री, खासदार, विभागप्रमुख, आमदार आणि शिवसेनेचे सर्व 94 नगरसेवक यांनी जोरदार तयारी केल्याचे चित्र आहे. चंद्रभागा नदीच्या तीरावरील ही महासभा ऐतिहासिक करण्यासाठी शिवसेनेचे संसदेतील गटनेते खासदार संजय राऊत, सचिव खासदार अनिल देसाई, खासदार विनायक राऊत, पर्यावरणमंत्री रामदास कदम, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार चंद्रकांत खैरे,खासदार अरविंद सावंत, सोलापूर संपर्कप्रमुख आमदार डॉ. तानाजी सावंत आदी येथे तळ ठोकून आहेत.

शिवसेनेच्या टार्गेट नुसार महाराष्ट्रसह विविध राज्यांमधून 5 लाखाहून अधिक शिवसैनिक आणि रामभक्त येतील.महासभेच्या 27 एकरावरील चंद्रभागा मैदानावर महासभेची जय्यत तयारी सुरू आहे. एक प्रमुख व्यासपीठ आणि दोन स्वतंत्र व्यासपीठ ही संत-महंत व महाराज मंडळींसाठी उभारली आहेत. सभेचा मंडप भगवामय असून येथे प्रभू श्रीराम, श्री विठ्ठल, छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य पुतळे या ठिकाणी उभारले आहेत अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी लोकमतशी बोलतांना दिली. 

टॅग्स :उद्धव ठाकरेपंढरपूर