Join us  

Uday Samant: "शिवसेनेचा गणवेश उतरवून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री गुवाहटीच्या शिंदे कॉलेजमध्ये"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 4:54 PM

सामंत यांचे विमानातील फोटोही समोर आले आहेत. त्यावरुन, आता मनसेनं शिवसेनेला टोला लगावला आहे. 

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना एकामागोमाग एक धक्के बसत असून मंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी होणाऱ्या शिवसेना आमदारांची संख्या वाढतच चालली आहे. दिलीप लांडे हे 38 वे आमदार त्यांच्या गटात गेल्यानंतर मंत्री उदय सामंत हेही गुवाहाटीला रवाना झाल्याचं समोर आले आहे. सकाळपासून सामंत नॉट रिचेबल होते. त्यानंतर उदय सामंत सूरतमार्गे गुवाहाटीला केल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली. ANI या वृत्त संस्थेनेही याबाबत ट्विट केले आहे. तसेच, सामंत यांचे विमानातील फोटोही समोर आले आहेत. त्यावरुन, आता मनसेनं शिवसेनेला टोला लगावला आहे. 

उदय सामंत यांच्या बंडानंतर शिंदे गटात सहभागी होणारे ते आठवे मंत्री आहेत. आतापर्यंत महाविकास आघाडी सरकारमधील एकनाथ शिंदे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, बच्चू कडू, शंभूराज देसाई यांच्यानंतर उदय सामंत हे आठवे मंत्री आहेत. सामंत यांच्या जाण्याने आता शिवसेनेत विधानसभेतून निवडून आलेले केवळ एकमेव आदित्य ठाकरे हे मंत्री शिल्लक राहिल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शिवसेनेला जबर धक्का बसला आहे. सामंत यांच्या गुवाहटीवारीवरुन मनसेनं शिवसेनेला टोला लगावला आहे. 

मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करुन एक चारोळी केली आहे. त्यामध्ये, उपरोधात्मक टोला लगावत शिवसेनेला डिवचलं आहे. सामंत यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण हे खातं होतं. त्या खात्याला अनुसरुन त्यांनी सामंत यांच्यावर उपहासात्मक टिका केली आहे.  दरम्यान, नुकतेच दोन दिवसापूर्वी उदय सामंत म्हणाले होते की, मी अजूनही शिवसेनेतच आहे. मी रत्नागिरीतील पाली इथे निवासस्थानी आहे. मी मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो असतो, तर मी गुवाहाटीला गेलो असतो आणि तिथून तुमच्याशी बोललो असतो, अशी कोपरखळी पत्रकारांना काढली होती. सध्या एकसंघ राहणं गरजेचं असल्याचं सामंत यांनी स्पष्ट केलं होते.  तसेच मी पक्ष जोडणारा आहे, तोडणारा नाही. मला वाटतं की, जे आपल्यापासून दूर गेले, त्यांच्याशी चर्चा करायला हवी. हे माझं वैयक्तिक मत आहे, असे त्यांनी म्हटले होते. मात्र, आता तेही गुवाहटीला निघून गेले आहेत. 

टॅग्स :उदय सामंतशिवसेनासंजय राऊतमनसे