आधी सलमानच्या घराबाहेर गेले अन् मग...; सिद्दींकीच्या कार्यालयाबाहेर सापडले सांगलीतील दोन भाऊ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 17:46 IST2025-06-28T17:46:04+5:302025-06-28T17:46:59+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर ताब्यात घेण्यात आलेल्या दोन तरुणांबद्दल महत्त्वाची समोर आली आहे.

Two youths who were detained outside the office of Nationalist Congress Party leader Zeeshan Siddiqui | आधी सलमानच्या घराबाहेर गेले अन् मग...; सिद्दींकीच्या कार्यालयाबाहेर सापडले सांगलीतील दोन भाऊ

आधी सलमानच्या घराबाहेर गेले अन् मग...; सिद्दींकीच्या कार्यालयाबाहेर सापडले सांगलीतील दोन भाऊ

Zeeshan Siddique: दिवंगत माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गेल्या वर्षी त्यांच्या कार्यालयाजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येचे खरं कारण अद्यापही समोर आलेलं नाही. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी आमदार झिशान सिद्दीकींचा पाठलाग करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सकाळपासून दोन तरुण झिशान सिद्दीकी यांच्यावर पाळत ठेवून होते अशी माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी या दोन्ही तरुणांना ताब्यात घेतलं आणि कसून चौकशीस सुरुवात केली. चौकशीनंतर आता या तरुणांबाबत माहिती समोर आली असून ते दोघेही सख्खे भाऊ असल्याचं समोर आलं आहे.

माजी आमदार झिशान सिद्दीकी यांच्या वांद्रे येथील कार्यालयाजवळ फिरणाऱ्या दोन सख्ख्या भावांना गुरुवारी रात्री निर्मल नगर पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मात्र ते दोघेही बॉलिवूड अभिनेता सलमान खानकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी झिशान यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत होते अशी माहिती पोलीस चौकशीत समोर आली. त्यानंतर निर्मल नगर पोलिसांनी सोडल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाकडून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

झिशान यांच्या कार्यालयाबाहेर सापडलेले हे दोन्ही तरुण सांगलीतील एका मराठी कुटुंबातील सख्खे भाऊ असून त्यांचा मसाल्याचा व्यवसाय आहे. मात्र काही कारणामुळे त्यांचा हा धंदा बुडाला आणि त्यांच्यावर ८० लाखांचे कर्ज झाले. याच धक्क्यातून त्यांच्या वडिलांनीही आत्महत्येचा प्रयत्न केल्याने हे संपूर्ण कुटुंब तणावाखाली आलं आहे. अशातच अभिनेता सलमान खान हा विविध उपक्रमाद्वारे गरीब तसे गरजूंना आर्थिक साहाय्य करतो आणि मदत मिळवून देतो असा एक व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर पाहिला होता. त्यामुळे सलमान खानकडे मदत मागण्याच्या उद्देशाने ते २४ जून रोजी मुंबईमध्ये आले होते.

मुंबईत आल्यानंतर दोघेही सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानी गेले. मात्र तिथल्या सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवले. तेव्हा एकाने त्यांना झिशान सिद्दीकी यांना भेटण्याचा दिला. त्यांनी गुगलवरून झिशान यांचा मोबाइल क्रमांक मिळवत त्यावर संपर्क केला. फोन उचणाऱ्या समोरच्या व्यक्तीने दोन्ही भावांना २६ जून रोजी दुपारी भेटायला बोलावलं होतं. त्यानुसार सकाळी ११ वाजल्यापासून दोघे भाऊ झिशान यांच्या कार्यालयासमोर त्यांची वाट पाहत होते.

 दुपारी झिशान सिद्दीकी ऑफिसमध्ये आले. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्यासोबत पोलीस कर्मचारी होते. कार्यालाच्या समोरच पोलिसांना पाहून त्यांना झिशान यांना भेटायची हिंमत त्यांना झाली नाही. मात्र झिशान यांच्या निकटवर्तीयांनी बऱ्याच वेळापासून कार्यालयाबाहेर असल्याचे पाहिले आणि त्यांना संशय आला. त्यांनी तात्काळ निर्मल नगर पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आणि सगळा प्रकार उघडकीस आला.

Web Title: Two youths who were detained outside the office of Nationalist Congress Party leader Zeeshan Siddiqui