हार्बर, पश्चिम रेल्वेवर २ नवीन एसी लोकल; २६ जानेवारीपासून मुंबईकरांचा प्रवास गारेगार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 11:03 IST2026-01-15T11:03:58+5:302026-01-15T11:03:58+5:30
मुंबई : २६ जानेवारीपासून मुंबई लोकलच्या हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर दोन नवीन एसी लोकल चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे ...

हार्बर, पश्चिम रेल्वेवर २ नवीन एसी लोकल; २६ जानेवारीपासून मुंबईकरांचा प्रवास गारेगार
मुंबई : २६ जानेवारीपासून मुंबईलोकलच्या हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर दोन नवीन एसी लोकल चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे लोकलप्रवास आणखी गारेगार होणार आहे. हार्बर मार्गावर एसी लोकलची मागणी होत असून, पश्चिम रेल्वेवर एसी लोकलमध्ये गर्दी वाढली आहे. त्यामुळे काही नॉन एसी फेऱ्यांच्या ऐवजी एसी फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.
नवी मुंबईकरांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल हा हार्बर मार्ग अत्यंत महत्त्वाचा असून, या मार्गावर आता एसी लोकल साडेतीन वर्षानी पुन्हा सुरू होणार आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, कमी प्रवासी संख्या आणि प्रचंड विरोध यांमुळे मे २०२२ मध्ये हार्बर मार्गावरील एसी लोकल सेवा बंद करण्यात आल्या होत्या. नंतर त्या मुख्य मार्गावर हलविण्यात आल्या. आता, नवी मुंबई आणि आसपासच्या भागातून वाढत्या मागणीमुळे त्या पुन्हा सुरू करण्यात येत आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी-पनवेल मार्गावर १४ नॉन-एसी लोकलऐवजी एसी लोकल सुरू करण्यात येणार आहेत.
दोन सेवा सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत चालतील. एसी लोकलच्या फेऱ्या केवळ सोमवार ते शनिवार या कालावधीतच सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.