Two men dressed and beaten on suspicion of mobile theft | मोबाइलचोरीच्या संशयावरून दोघांना विवस्त्र करून मारहाण

मोबाइलचोरीच्या संशयावरून दोघांना विवस्त्र करून मारहाण

कल्याण : मोबाइलचोरीच्या संशयावरून दोघांना व्यापाऱ्यांनी विवस्त्र करून बेदम मारहाण केल्याचा प्रकार कल्याण पश्चिमेतील एपीएमसी मार्केटच्या आवारात गुरुवारी घडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच तसेच याप्रकरणी तक्रारी दाखल झाल्यावर बाजारपेठ पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा नोंदवला आहे.

एपीएमसी मार्केटमध्ये काही दिवसांपासून मोबाइलचोरीचे प्रकार वारंवार घडत आहेत. गुरुवारी सकाळी मनीष गोसावी आणि सिद्धुक गुजर हे दोघे तेथे संशयितरीत्या वावरताना आढळले. त्यामुळे १० ते १२ व्यापाऱ्यांनी त्यांना विवस्त्र करून मारहाण केली. त्यात ते दोघे गंभीर जखमी झाले. मारहाण केल्यानंतर दोघांना बाजारपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्या दोघांना उपचारासाठी केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
गोसावी आणि गुजर यांना विवस्त्र करून मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच भाजपचे कार्यकर्ते महेंद्र मिरजकर यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत कायदा हातात घेऊन मारहाण करणाºयांवर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच एपीएमसी मार्केटमधील व्यापारी सलमान शेख यांनीही मारहाणीबाबत हरकत घेतली आहे. शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. गोसावी आणि गुजर यांच्याविरोधात अन्यत्र कुठे गुन्हे दाखल आहेत का, याचाही तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान, गोसावी आणि गुजर हे संशयित आहेत. चोर आहेत की नाही, हे पोलीस तपासाअंती स्पष्ट होईल. परंतु, दोघांना मारहाण करण्याऐवजी संबंधित व्यापाºयांनी त्यांना तत्काळ पोलिसांच्या ताब्यात देणे आवश्यक होते. मात्र, तसे झाले नाही. मारहाणप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असल्याची माहिती तक्रारदार शेख आणि मिरजकर यांनी दिली.

संबंधितांवर कडक कारवाई करणार
गोसावी आणि गुजर यांना ज्या लोकांनी बेदम मारहाण केली, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली आहे. संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल.
- यशवंत चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बाजारपेठ पोलीस ठाणे

Web Title: Two men dressed and beaten on suspicion of mobile theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.