Join us

दहिसरला १.४३ कोटींचे दोन किलो सोने जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 05:58 IST

अवधूत नगर भागात आयोगाच्या स्थिर सर्वेक्षण पथकाला  १.४३ कोटी रुपये किमतीच्या १.९५ किलो बेहिशेबी सोन्याची वाहतूक होत असल्याचे आढळले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पश्चिम उपनगरातील दहिसर विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाच्या स्थिर सर्वेक्षण पथकाने सुमारे दोन किलो बेहिशेबी सोने जप्त केले आहे. त्याची किंमत एक कोटी ४३ लाख रुपये आहे. 

निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी मद्य, रोकड आणि भेटवस्तूंचे आमिष दाखवण्यात येते. असे प्रकार सर्रास घडत असल्यामुळे निवडणूक आयोगाची पथके डोळ्यात तेल घालून वाहनांची तपासणी करतात. त्यानुसार दहिसर विधानसभा क्षेत्राचे केंद्रीय खर्च निरीक्षक सौरभ कुमार शर्मा यांच्या निर्देशानुसार आणि निवडणूक निर्णय अधिकारी शीतल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित तपासणी सुरू होती. यावेळी अवधूत नगर भागात आयोगाच्या स्थिर सर्वेक्षण पथकाला  १.४३ कोटी रुपये किमतीच्या १.९५ किलो बेहिशेबी सोन्याची वाहतूक होत असल्याचे आढळले. पथकाने हे सोने जप्त केले. 

मतदारांवर प्रभाव टाकण्याच्या हेतूने करण्यात येणाऱ्या गैर कृत्यांना आळा घालण्याचा आणि कारवाई करण्याचा आयोगाचा प्रयत्न आहे, असे केंद्रीय खर्च निरीक्षक शर्मा यांनी सांगितले.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४सोनं