मुंबईत पकडलेल्या त्या दोन बांगलादेशींना मायदेशी पाठवलं, आता पुन्हा कफ परेडमध्ये सापडल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 15:46 IST2026-01-14T15:45:05+5:302026-01-14T15:46:05+5:30
Bangladesh Women Arrested, Mumbai Police: पोलिसांनी मुंबईच्या कफ परेड परिसरातून दोघींना घेतलं ताब्यात

मुंबईत पकडलेल्या त्या दोन बांगलादेशींना मायदेशी पाठवलं, आता पुन्हा कफ परेडमध्ये सापडल्या...
Bangladesh Women Arrested, Mumbai Police: मुंबई पोलिसांनी शहरात अवैधपणे वास्तव्यास असलेल्या दोन बांगलादेशी महिलांना अटक केली. विशेष म्हणजे, या महिलांना ऑगस्ट २०२५ मध्येच मुंबई गुन्हे शाखेने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून बांगलादेशात हद्दपार (Deport) केले होते. मात्र, अवघ्या काही महिन्यांतच त्यांनी पुन्हा छुप्या मार्गाने भारतात प्रवेश मिळवला, ज्यामुळे सुरक्षा यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नेमकी घटना काय?
मुंबईच्या कफ परेड आणि नागपाडा परिसरातून या दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले. पहिली महिला ही ३० वर्षीय बिल्किस बेगम सिरमिया अख्तर हिला कफ परेड परिसरातून अटक करण्यात आली. तर दुसरी महिला ३८ वर्षीय जुलेखा जमाल शेख हिला कुलाबा पोलिसांनी नागपाडा येथून ताब्यात घेतले गेले. तपासात असे समोर आले आहे की, त्यांच्याकडे भारतात राहण्यासाठी कोणतेही वैध कागदपत्रे किंवा पासपोर्ट किंवा व्हिसा नव्हता.
घुसखोरीसाठी 'गोजा डंगा' जंगलाचा वापर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघींनी भारत-बांगलादेश सीमेवरील 'गोजा डंगा' येथील घनदाट जंगलाचाच्या मार्गाने पुन्हा भारतात प्रवेश केला. सीमेवरील कडक सुरक्षा भेदून त्या थेट मुंबईपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाल्या. या महिलांच्या पुनरागमनामुळे मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्या किंवा सीमाभागातील सुरक्षा त्रुटींबाबत आता गंभीर तपास सुरू झाला आहे.
पोलिस कारवाईत काय घडलं?
सध्या कुलाबा आणि कफ परेड पोलीस ठाण्यात या दोन्ही महिलांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घुसखोरीमागे कोणाचे सहकार्य लाभले, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे मुंबईसारख्या संवेदनशील शहरात विदेशी नागरिकांच्या अवैध वास्तव्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.