सेफ्टी बॉटल दिखाओ म्हणाले; पण भामटे जाळ्यात अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 17:32 IST2025-09-13T17:31:55+5:302025-09-13T17:32:28+5:30

मुंबई महापालिकेचे अधिकारी असल्याचे सांगून फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

Two arrested for defrauding Mumbai Municipal Corporation officials | सेफ्टी बॉटल दिखाओ म्हणाले; पण भामटे जाळ्यात अडकले

सेफ्टी बॉटल दिखाओ म्हणाले; पण भामटे जाळ्यात अडकले

मुंबई : महापालिकेचे अधिकारी असल्याचा बनाव करत फायर सेफ्टी बॉटल तपासणीच्या निमित्ताने पाच हजार रुपयांची मागणी करणाऱ्या दोघा भामट्यांना जोगेश्वरी पोलिसांनी अटक केली. उमेश ठाकूर (वय ४०) आणि हर्षद कतपरा (२७) अशी त्यांची नावे असून, त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तक्रारदार चिराग कंटारिया यांचे जोगेश्वरी पूर्वेकडील पायोनियर इंडस्ट्रीज संकुलामध्ये गारमेंटचे दुकान आहे. ११ सप्टेंबरला ते दुकानात असताना दोन अनोळखी व्यक्ती तेथे आल्या. त्यांनी स्वतःची ओळख 'बृहन्मुंबई महापालिकेचे कर्मचारी' म्हणून करून दिली आणि आयकार्ड दाखवले. यानंतर त्यांनी चिराग यांना विचारले, 'आप के शॉप पर फायर सेफ्टी बॉटल है क्या? दिखाओ.' चिराग यांनी ती दाखवली; मात्र ती रिकामी असल्याचे पाहून पाच हजार रुपयांचा दंड भरावा लागेल, असे त्या दोघांनी सांगितले. चिराग यांनी दंडाची पावती मागितली, तेव्हा त्यांपैकी एकाने सांगितले की, 'पावती हवी असेल तर दुप्पट फाइन भरावा लागेल.' त्यामुळे चिराग व त्यांच्या पत्नीला शंका आली. त्यांनी तत्काळ मित्र आतीश तिवारी यांना फोन करून बोलावले. आतीश यांनी दोघांच्या आयकार्डची वैधता तपासली, तेव्हा त्यावरील कालावधी १० एप्रिल २०२५ ते २३ ऑगस्ट २०२५ असा होता. याच दरम्यान, त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना फोन करून सत्यता पडताळण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी तिथून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र इमारतीतील सुरक्षारक्षक उमेश मंडल यांनी सतर्कता दाखवत दोघांनाही रंगेहात पकडले. त्यावेळी आरोपींनी आपली नावे उमेश ठाकूर आणि हर्षद कतपरा असल्याचे सांगितले.
 

Web Title: Two arrested for defrauding Mumbai Municipal Corporation officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.