Join us

मराठा मोर्चाच्या व्हिडिओवरून संजय राऊत अन् नितेश राणेंमध्ये ट्विटर'वॉर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 14:55 IST

आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांच्या ट्विटला उत्तर देत माफी मागण्याची मागणी केली आहे.

मुंबई - महाविकास आघाडीच्या हल्लाबोल मोर्चानंतर केलेल्या ट्विटमुळे शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांची कोंडी झाली. मविआच्या मोर्च्याची काही दृश्य समोर आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मविआच्या मोर्चाची नॅनो मोर्चा म्हणून खिल्ली उडवली. मग फडणवीसांच्या टीकेवर राऊतांनी एक व्हिडिओ पोस्ट करून प्रत्युत्तर दिले. मात्र याच व्हिडिओमुळे सध्या राऊतांवर सत्ताधाऱ्यांनी निशाणा साधला आहे. 

आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांच्या ट्विटला उत्तर देताना म्हटलंय की, शिवछत्रपतींच्या वंशजांना दाखले मागायचे, मराठा क्रांती मोर्चाला मुका मोर्चा म्हणून हिणवायचं आणि त्याच मराठा मोर्च्याच्या पदराखाली आपले अपयश लपवायचे अशा नीच वृत्तीचा आणि संजय राऊतांचा निषेध करतो. राऊतांनी मराठा समाजाची माफी मागायला हवी असं त्यांनी सांगितले. 

काय म्हटले होते संजय राऊत?मराठा मोर्चा व्हिडिओवरून टीकास्त्र होऊ लागल्यानंतर संजय राऊतांनी ट्विट केले होते. त्यात लिहिलं होतं की, मराठा मोर्चादेखील महाराष्ट्र स्वाभिमान, न्याय हक्कांसाठी निघाला. शिवरायांचा जयघोष करत त्याच मार्गावरून त्याच ताकदीने निघाला. तेव्हादेखील आजच्या प्रमाणे विराट मोर्चाची चेष्टा दबक्या आवाजात हेच लोक करत होते. दोन्ही मोर्चे महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवणारे होते तूर्त इतकेच असं राऊतांनी म्हटलं होतं. 

नेमकं काय घडलं? मुंबईत निघालेल्या दोन्ही बाजूंच्या मोर्चांपैंकी कुणाच्या मोर्चाला अधिक गर्दी होती हे दाखविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसत आहे. यातच फडणवीसांच्या 'नॅनो मोर्चा' या टीकेला उत्तर देताना शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी एक व्हिडीओ ट्विट करत, 'देवेंद्र फडणवीस ज्यास नॅनो मोर्चा म्हणून हिणवत आहेत तो हाच,' असे म्हटले होते.

मी नक्की पडताळणी करेन राऊतांच्या या ट्विटसंदर्भात एका पत्रकाराने पत्रकारपरिषदेदरम्यान फडणवीस यांना प्रश्न केला होता. यावर, "तुम्ही नवीनच माहिती देत आहात, मलाही हे माहीत नव्हते. आता संजय राऊतांनी मोर्चाचा जो व्हिडिओ ट्विट केला आहे, तो मराठा मोर्चाचा व्हिडिओ आहे. त्याची मी नक्की पडताळणी करेन. पण असू शकतो. कारण ते अधूम मधून असे करत असतात. कारण मोठा मोर्चा नव्हताच. त्यामुळे त्याचा व्हिडिओ आणायचा असेल तर तो दुसऱ्या मोर्चाचाच ट्विट करावा लागेल," असे फडणवीस म्हणाले होते. 

टॅग्स :नीतेश राणे संजय राऊत