Join us  

बँक कर्मचाऱ्याने महाराष्ट्राला शिकवू नये; शिवसेनेचं अमृता फडणवीसांना सणसणीत उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 1:38 PM

गेल्या काही दिवसांपासून अमृता फडणवीस ट्विटरवरुन वारंवार शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाला लक्ष्य करत आहेत.

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून अमृता फडणवीस ट्विटरवरुन वारंवार शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाला लक्ष्य करत आहेत.चतुर्वेदी यांनी 'महाराष्ट्राने काय करावे हे शिकवणे अ‍ॅक्सिस बँकेच्या कर्मचाऱ्याचं काम नाही' असं म्हणत अमृता फडणवीस यांना टोला लगावला अ‍ॅक्सिस बँकेतील खाती राष्ट्रीयकृत बँकेत वळवण्याच्या निर्णयावरून अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

मुंबई:  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच्या विधानावरुन सध्या युद्ध रंगले आहे. गेल्या काही दिवसांपासून अमृता फडणवीस ट्विटरवरुन वारंवार शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाला लक्ष्य करत आहेत. वाईट नेता मिळणे ही महाराष्ट्राची चूक नाही, पण अशा नेत्यासोबत राहणे ही चूक आहे, असे म्हणत 'जागो महाराष्ट्र' अशी टिप्पणी केली आहे. तसेच अ‍ॅक्सिस बँकेतील खाती राष्ट्रीयकृत बँकेत वळवण्याच्या निर्णयावरून अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांनी सणसणीत उत्तर दिलं आहे. 

प्रियंका चतुर्वेदी यांनी 'महाराष्ट्राने काय करावे हे शिकवणे अ‍ॅक्सिस बँकेच्या कर्मचाऱ्याचं काम नाही' असं म्हणत अमृता फडणवीस यांना टोला लगावला आहे.  पोलीस कर्मचाऱ्यांची अ‍ॅक्सिस बँकेतील खाती राष्ट्रीयकृत बँकांमध्ये वळती करण्याचा निर्णय ठाकरे सरकारकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. अ‍ॅक्सिस बँकेत 2 लाख पोलीस कर्मचाऱ्यांची खाती आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पोलिसांची खाती अ‍ॅक्सिस बँकेत वळवण्यात आली होती. फडणवीस यांच्या पत्नी अमृता अ‍ॅक्सिस बँकेत वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारनं पोलिसांची खाती वळती करण्याचा निर्णय घेतल्यास तो अमृता फडणवीस यांच्यासाठी मोठा धक्का असेल, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

'अमृता फडणवीस यांना एक सूचना आहे. महाराष्ट्राने काय करावे हे शिकवण्याचं काम अ‍ॅक्सिस बँकेच्या कर्मचाऱ्याचं नाही. मुलाखत वाचून मी महाराष्ट्र सरकारला विनंती करते की, कोणत्या परिस्थितीत अ‍ॅक्सिस बँकेत खाते वळवण्यात आले याची चौकशी करावी. त्याचबरोबर अ‍ॅक्सिस बँकेत खाते वळवण्यात आल्यानंतर अ‍ॅक्सिस बँकेकडून भाजपाच्या योजनांसाठी सीएसआर देण्यात आला होता की नाही याचाही तपास करावा' असं ट्विट प्रियंका चतुर्वेदी यांनी केलं आहे. 

मुख्यमंत्री बंगल्यावरील एका बेडरूममध्ये उद्धव ठाकरेंचा द्वेष करणारा मजकूर लिहिलेला व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये देवेंद्र फडणवीस रॉक्स असं लिहिण्यात आलं आहे. तसेच हू इज यू टी म्हणजे यु टी कोण आहेत...? यू टी इज मीन म्हणजे यू टी वाईट आहेत. 'यूटी' म्हणजे नेमकं कोण?; यावरून आता तर्कवितर्क लावले जात असले तरी उद्धव ठाकरे यांच्या नावाचं इंग्रजीतील संक्षिप्त रूप 'यूटी' असं होतं. त्यामुळं हे त्यांनाच उद्देशून असल्याची चर्चा आहे. मात्र, ते नेमकं कोणी लिहिलं आहे, व्हिडिओ कोणी चित्रण केला आहे, याबाबत मात्र कोणतीही सध्या माहिती समोर आलेली नाही.

उद्धव ठाकरेंचा द्वेष करणारा मजकूर फडणवीसांची मुलगी दिविजाने लिहिल्याची चर्चा होत आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना, मी बंगला सोडताना कोपरा कोपरा पाहिलेला आहे. यामुळे तिने असे केलेले नाही, असे म्हटले आहे. तसेच हे आपल्याविरोधातील षड्यंत्र असल्याचा आरोप केला आहे. तिथे स्टाफही राहतो. त्यांच्या खेळणाऱ्या मुलांपैकी कोणीतरी केले असेल.तर अमृता फडणवीस यांनी यावर खुलासा करताना आम्ही महिन्य़ापूर्वीच वर्षा बंगला सोडला आहे. बंगला सोडताना सगळं तपासलेले होते. त्यानंतर एकदाही तिथे गेलेलो नाही. हे लिखाण दिविजा किंवा अन्य कोणी केलेले नाही, असे म्हटले आहे. 

 

टॅग्स :अमृता फडणवीसशिवसेनाभाजपाबँकउद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीस