एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 06:20 IST2025-07-01T06:19:44+5:302025-07-01T06:20:14+5:30
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सोमवारी शिंदेसेनेच्या मुख्य नेतेपदी फेरनिवड करण्यात आली.

एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सोमवारी शिंदेसेनेच्या मुख्य नेतेपदी फेरनिवड करण्यात आली. शिंदेसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नरिमन पॉइंट येथील महिला विकास मंडळाच्या सभागृहात पार पडली. या बैठकीत एकमताने ही निवड करण्यात आली.
माजी खासदार राहुल शेवाळे यांनी शिंदे यांची मुख्य नेतेपदी फेरनिवड करण्याचा ठराव मांडला, तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला. नेतेपदी फेरनिवडीबरोबरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातील निर्णय घेण्याचे सर्वाधिकारही शिंदे यांना देण्याचा ठरावही संमत करण्यात आला. या बैठकीला पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी उपस्थित होते.
पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांना संबोधताना शिंदे म्हणाले की, कमी बोलू आणि जास्त काम करू तेवढे चांगले. विरोधकांना एक्स्पोज करताना स्वतः एक्स्पोज होऊ नका. तुमचा चुकीचा शब्द पक्षाला अडचणीत आणतो. आपण एवढे मोठे यश मिळविले, ते चुकीचे बोलून घालवू नका. शिस्तीला तडा जाईल, असे काही करू नका, जास्त ऐका, कमी बोला. पक्षांतर्गत पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी सर्वांनाच निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. पक्षाचे सक्रिय सदस्य हेच मतदार असतील, असे शिंदे म्हणाले.
पक्षप्रमुख की राष्ट्रीय प्रमुख?
पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या शिंदे यांनी मुख्य नेता ऐवजी पक्षप्रमुख हे पद घ्यावे, अशी मागणी काहींनी यावेळी केली, तर काही जणांचे म्हणणे होते की, आपला पक्ष राष्ट्रीय आहे, त्यामुळे राष्ट्रीय प्रमुख हे पद घ्यावे.
मात्र, मला कोणते पद द्यायचे, यात पदाधिकाऱ्यांचे एकमत नाही. त्यामुळे आधी पदाधिकाऱ्यांनी एकमत करा, तोपर्यंत माझे मुख्य नेता हेच पद कायम राहील, असे एकनाथ शिंदे म्हणाले.