'ट्रम्पच्या लवाजम्यानं भारतात कोरोना पसरवला, आता जॉन्सन यांच्याबाबतीत काय करायचं?'

By महेश गलांडे | Published: December 23, 2020 08:31 AM2020-12-23T08:31:14+5:302020-12-23T08:33:26+5:30

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातूनही यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला आहे. गतवर्षी डोनाल्ड ट्रम्प अहमदाबादला आले आणि त्यांच्यासोबत असलेल्या गोतावळ्यानं भारतात कोरोना पसरवला

'Trump's entourage spread Corona in India, now what about Johnson?', shiv sena ask | 'ट्रम्पच्या लवाजम्यानं भारतात कोरोना पसरवला, आता जॉन्सन यांच्याबाबतीत काय करायचं?'

'ट्रम्पच्या लवाजम्यानं भारतात कोरोना पसरवला, आता जॉन्सन यांच्याबाबतीत काय करायचं?'

Next
ठळक मुद्देशिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातूनही यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला आहे. गतवर्षी डोनाल्ड ट्रम्प अहमदाबादला आले आणि त्यांच्यासोबत असलेल्या गोतावळ्यानं भारतात कोरोना पसरवल्याचे म्हटलंय.

मुंबई - देशात 26 जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला भारत सरकारने प्रमुख पाहुणे म्हणून ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना निमंत्रण दिले आहे. मात्र, ब्रिटनमध्ये कोरोनाचा हाहाकार पहायला मिळत असून कोरोनाचा ब्रिटमधील दुसरा प्रकार पहिल्यापेक्षा घातक आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने पुढील 15 दिवसांपर्यंत ब्रिटनमधून भारतात येणारी विमानसेवा बंद केली आहे. त्यामुळे, 26 जानेवारीच्या कार्यक्रमाला बोरीस येणाऱ्या बोरीस यांच्याबाबतीत नेमकं काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातूनही यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला आहे. गतवर्षी डोनाल्ड ट्रम्प अहमदाबादला आले आणि त्यांच्यासोबत असलेल्या गोतावळ्यानं भारतात कोरोना पसरवला. मग, यंदा ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन येत आहेत. आता, त्यांच्याबाबतीत काय करायचं? असा प्रश्न शिवसेनेनं विचारला आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी बोलताना काँग्रेस नेते आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनीही बोरीस जॉन्सन यांच्या कार्यक्रमसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. त्यामुळे, आता भारत सरकार काय निर्णय घेणार, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.   

आपण आता ब्रिटनहून येणारी विमाने बंद केली. ब्रिटनहून कालपर्यंत जे आले त्यांना 14 दिवस क्वारंटाईन केले. प्रश्न आहे ब्रिटिश पंतप्रधान जॉन्सन यांचा. दिल्लीतील 26 जानेवारीच्या सोहळय़ात जॉन्सनसाहेब प्रमुख पाहुणे आहेत. त्यामुळे 'बहिष्कृत' ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन हे दिल्लीत येतील काय? मागे 'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमासाठी ट्रम्प हे अहमदाबादेत आले व ट्रम्पबरोबरच्या लवाजम्याने कोरोना पसरविण्याचे काम केले. त्यामुळे ट्रम्पच्या तुलनेत सज्जन व सरळ असलेल्या जॉन्सन यांच्याबाबतीत काय करायचे, हा प्रश्नच आहे. ब्रिटनमध्ये नवा कोरोना विषाणू वेगाने पसरत आहे. त्यामुळे जग भयभीत झाले आहे, असे शिवसेनेनं म्हटलंय.  

महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी

महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी लागू करून सावधानता बाळगली, पण दुसऱ्या कोरोनामुळे पुन्हा एकदा लोकांच्या पोटावरच पाय आला. 2020 चे वैफल्यग्रस्त वर्ष मावळून नवा आशेचा सूर्य तेजाने तळपेल असे वाटले होते, पण राज्यात 5 जानेवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. मुंबईसारख्या शहरात नाइट लाइफ सुरू असावी अशी मागणी होती. आता रात्रीची संचारबंदी सुरू झाली. नवीन वर्षात नवा कोरोना हे चित्र निराशाजनक आहे. यातून मार्ग काढावा लागेल. सगळ्यांचेच चेहरे काळजीने करपून गेलेले दिसतात. काय करावे? कसे करावे? उद्या काय होणार? हीच चिंता ज्याला त्याला लागून राहिली आहे. लोकांच्या सोशिकपणालाही मर्यादा आहेत हे मान्य, पण आज तरी आहे त्या परिस्थितीला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नाही, असे राऊत यांनी म्हटलंय.

Web Title: 'Trump's entourage spread Corona in India, now what about Johnson?', shiv sena ask

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.