मुंबईत झाडांची तोडणी; पुनर्रोपण चंद्रपूरला, हवामान कसे सुधारेल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 16:17 IST2026-03-23T16:16:51+5:302026-03-23T16:17:42+5:30
मुंबई महानगरात वाहतूक सुविधांचा विस्तार करण्यासाठी रस्ते, उड्डाणपूल, सागरी सेतू, कोस्टल रोड, मेट्रो, आदी विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे सुरू आहेत.

मुंबईत झाडांची तोडणी; पुनर्रोपण चंद्रपूरला, हवामान कसे सुधारेल?
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महानगरात वाहतूक सुविधांचा विस्तार करण्यासाठी रस्ते, उड्डाणपूल, सागरी सेतू, कोस्टल रोड, मेट्रो, आदी विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या प्रकल्पांच्या आड येणारी कांदळवने आणि वृक्ष मोठ्या प्रमाणात तोडावी लागत आहेत. यातील काही प्रकल्पांसाठी तोडण्यात येणाऱ्या वृक्षांचे पुनर्रोपण मुंबई शहराच्या हद्दीत न करता ते थेट चंद्रपूरसह विदर्भातील जिल्ह्यांमध्ये केले जात आहे. मात्र, हे पुनर्रोपण मुंबईतील प्रदूषण आणि तापमानवाढीवर नियंत्रण मिळवणार कसे? हा प्रश्न तज्ज्ञ विचारत आहेत.
मुंबई महानगरात गेल्या काही वर्षांत विकास प्रकल्पांची कामे विविध प्राधिकरणांनी मोठ्या प्रमाणात हाती घेतली आहेत. मुंबईकरांचे जीवन सुकर करण्यासाठी हे प्रकल्प महत्त्वपूर्ण असले तरी प्रदूषणाची पातळीही वाढू लागली आहे. वाढत्या तापमानवाढीमुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. मुंबईतील वर्सोवा ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामासाठी तोडण्यात येणाऱ्या कांदळवनांची भरपाई म्हणून चंद्रपूर येथे झाडे लावली जाणार आहेत. तसेच मुंबईत तोडण्यात येणाऱ्या कांदळवनाची भरपाई म्हणून पालघरला ही झाडे लावली जाणार आहेत. विक्रोळी-खारघर ट्रान्समिशन लाईनसाठी तोडण्यात येणारी झाडे शहापूर येथे लावली जाणार आहेत.
मुंबई शहरात तोडलेल्या झाडांची भरपाई पालघर, चंद्रपूरला केली म्हणून कोणी हवा खाण्यासाठी तिकडे जाणार नाही.
...तर जैवविविधतेला धोका
१. कांदळवन वाढीसाठी भरती-ओहोटीचे पाणी येणारी जागा आवश्यक असते. ही कांदळवने अनेक माशांच्या प्रजननाची जागा असते. प्रकल्पांच्या नावाखाली ही परिसंस्था नष्ट करणे पूर्णपणे अयोग्य आहे.
२. सध्या तापमान वाढ ही प्रक्रिया अपरिवर्तनीय झाली आहे, असे मत भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळीचे निमंत्रक गिरीश राऊत यांनी व्यक्त केले.
प्रकल्पांसाठी वृक्षतोड
शहापूर येथेही विविध प्रकल्पांच्या कामांसाठी वृक्षतोड सुरू आहे. त्यातून मुंबईपासून नाशिक, पुण्यापर्यंतच्या भागाचे वाळवंटीकरण करणे सुरू आहे, असा आरोप पर्यावरणवादी कार्यकर्ते स्टॅलिन डी. यांनी केला.