प्रवासी संघटना रेल्वेमंत्र्यांच्या भेटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 02:55 AM2019-07-29T02:55:46+5:302019-07-29T02:56:03+5:30

रखडलेले प्रकल्प मार्गी लावा : समाजकंटकांद्वारे लोकलवर होणाऱ्या दगडफेकीवरही चर्चा

Travelers' Union visits Railway Minister | प्रवासी संघटना रेल्वेमंत्र्यांच्या भेटीस

प्रवासी संघटना रेल्वेमंत्र्यांच्या भेटीस

Next

मुंबई : मुंबईचा चेहरा बदलणारे प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडलेले आहेत. हे प्र्रकल्प लवकर मार्गी लावण्यासाठी मुंबईमधील प्रवासी संघटनांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली. या वेळी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रवासी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी मुंबईतील रखडलेले प्रकल्प आणि लोकलवर होणाºया दगडफेकीवर चर्चा करण्यात आली.

दिवा-ठाणे पाचवी आणि सहावी मार्गिका, कल्याण ते कसारा तिसरी आणि चौथी मार्गिका, पनवेल-कर्जत दोन रेल्वे मार्गिका या प्रकल्पांच्या कामाचा वेग वाढविणे आवश्यक असल्याचे निवेदन प्रवासी संघटनांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन दिले. समाजकंटकांकडून लोकलवर दगडफेक होण्याचे प्रमाण वाढले आहे, यावर सुरक्षा विभागाकडून उपाययोजना व्हायला पाहिजेत, अशी भूमिकाही प्रवासी संघटनांनी मांडली. रेल्वे स्थानकांवर गुर्दल्ले, मानसिक रुग्ण यांचा वावर वाढला आहे. त्यांना अटक केली जाते, मात्र पुन्हा सोडण्यात येते. त्यामुळे प्रवाशांना पुन्हा त्यांचा त्रास सहन करावा लागतो. या कारणास्तव मुंबईमध्ये तुरुंगांचा विस्तार केला पाहिजे. महिला कैद्यांना तुरुंग नसल्याने त्यांच्यासाठी तुरुंग उभारले पाहिजेत. रेल्वे अपघातांत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना उचलण्यासाठी कामगारांची नेमणूक केली पाहिजे, असे मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या सदस्या (झेडआरयूसीसी) वंदना सोनावणे यांनी सांगितले.
दिवा-वसई मार्ग उपनगरीय मार्ग घोषित करून यावरून लोकल सेवा सुरू करणे. मुंबई-पुणे मार्गावरील सर्व लेव्हल क्रॉसिंग बंद करून रोड ओव्हर ब्रिज उभारणे त्याचप्रमाणे डोंबिवली स्थानकातून सीएसएमटी दिशेकडे जाणारी जलद लोकल सुरू करणे आवश्यक आहे, अशी भूमिका उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी मांडली.

रेल्वे अधिकारी आणि पोलिसांद्वारे जनजागृती
तर मालाडमध्ये स्थानिकांना एकत्र करून धावत्या लोकलवर दगडफेक करणाºया पकडण्यास मदत करण्याचे आवाहन आरपीएफद्वारे केले. लोकलवर दगडफेक करणे रेल्वे कायद्यानुसार गुन्हा आहे. कोणताही व्यक्ती असे करत असल्याचे दिसल्यास १८२ क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आरपीएफद्वारे करण्यात आले.

तर नुकताच नाहूर स्थानकावर फलाट क्रमांक १ आणि २ वर सायंकाळच्यावेळी जनजागृती कार्यक्रम करण्यात आले. यावेळी सामाजिक संघटना आणि स्थानिक उपस्थित होते, अशी माहिती कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. ए. इनामदार यांनी दिली.

मागील अनेक दिवसांपासून कांजूरमार्ग ते कुर्ला या भागात धावत्या लोकलवर दगडफेक करण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर कायमस्वरूपी लगाम लावण्यासाठी रेल्वे अधिकारी, पोलिसांद्वारे स्थानिक रहिवासीमध्ये जनजागृती केली. रेल्वे प्रशासन आणि कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याच्यावतीने गुरूवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळ जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये २०० हून अधिक स्थानिक रहिवासी सहभागी होते. पोलीसांच्या मदतीला अनेक सामाजिक संघटना पुढे आल्या होत्या, अशी माहिती कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.ए.इनामदार यांनी दिली.

Web Title: Travelers' Union visits Railway Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.