‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 06:59 IST2025-11-03T06:58:41+5:302025-11-03T06:59:11+5:30
ओला, उबर, रॅपिडोचे भाडे दुप्पट, चालकाकडे अतिरिक्त हेल्मेटही नाही

‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईसह राज्यभर केवळ इलेक्ट्रिक बाइक टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी परिवहन विभागाने परवानगी दिली आहे. त्यानुसार कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ओला, उबर आणि रॅपिडो या कंपन्यांना तात्पुरते परवानेही दिले आहेत. त्यानंतरही तिन्ही कंपन्यांची बाइकटॅक्सी ही वाहने इलेक्ट्रिकऐवजी पेट्रोलवर धावणारी आहेत. आरटीओकडून अशा बाइक चालकांवर कारवाई केली जात असली तरी कंपन्या जुमानत नसल्याचे चित्र आहे. इलेक्ट्रिक बाइकच्या माध्यमातूनच टॅक्सी सेवेला परवानगी आहे. असे असताना ॲपवर आणि रस्त्यांवर मात्र पेट्रोल बाइक टॅक्सी उपलब्ध होते.
ओला कंपनीने तर त्यांच्या ताफ्यात अनेक कंपन्यांच्या पेट्रोलवर धावणाऱ्या बाईक असल्याचे ॲपवर अधिकृतपणे नमूद केले आहे. रॅपिडो आणि उबर कंपनीने तसे स्पष्ट नमूद केले नसले तरी त्यांच्या ॲपच्या माध्यमातून पेट्रोल बाइकच उपलब्ध होतात. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
दोन-तीन वर्षांपासून बाइक टॅक्सी रस्त्यांवर
‘लोकमत’ने लोअर परळ ते कुलाबासाठी बाइक राइड बुक केली असता इलेक्ट्रिक बाइकऐवजी पेट्रोल बाइक हजर झाली. भाडे देखील ठरवून दिलेल्या भाड्यापेक्षा दुप्पट होते. रॅपिडोवरून ॲक्टिव्हा, तर ओलावरून पॅशन प्रो या पेट्रोलवर चालणाऱ्या बाइक आल्या. चालकांकडे अतिरिक्त हेल्मेट नव्हते. दोन ते तीन वर्षांपासून बाइकटॅक्सी चालवत असल्याचे चालकांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर एका बाइक टॅक्सीचा नुकताच अपघात झाला होता, हे येथे महत्त्वाचे.
दोन एफआयआर दाखल
अलीकडेच मुंबईच्या पूर्व भागात एका बाईक-टॅक्सीचा अपघात झाला होता. यामध्ये चालकाचा मृत्यू झाला. ही घटना सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवर काँक्रीट मिक्सर ट्रकच्या धडकेमुळे घडली. त्यानंतर पुन्हा बाईक-टॅक्सींच्या धोक्यांकडे लक्ष वेधले. परिवहन विभागाकडून शहरामध्ये अनधिकृतपणे पेट्रोल बाईक टॅक्सी धावत असल्याने २ एफआयआरही दाखल केल्या होत्या. तर, आरटीओ कार्यालयांनी अशा बाईक टॅक्सीवर कारवाई करत त्यांच्याकडून दंड आकारले होते. असे असताना कंपन्यांनी मात्र परिवहन विभागाच्या कारवाईकडे दुर्लक्ष करत आहेत.