वेळापत्रक देऊनही कंपनीने एकही बस पुरवली नाही; भाडेतत्त्वावरील इलेक्ट्रिक बसपुरवठ्याचा करार रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 10:30 IST2025-05-28T10:30:24+5:302025-05-28T10:30:24+5:30
वेळेत बस न पुरविणाऱ्या कंपनीची प्रलंबित बिलाची काही रक्कम चुकती करण्यात आली होती

वेळापत्रक देऊनही कंपनीने एकही बस पुरवली नाही; भाडेतत्त्वावरील इलेक्ट्रिक बसपुरवठ्याचा करार रद्द
मुंबई : राज्य परिवहन महामंडळाला (एसटी) भाडेतत्त्वावरील ५,१५० इलेक्ट्रिक बस पुरवठा करण्यासाठी इव्हे ट्रान्स कंपनी अपयशी ठरल्याने तिचे कंत्राट रद्द करण्याचे निर्देश परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले. एसटी महामंडळाला मे महिन्याच्या २२ तारखेपर्यंत १,२८७ इलेक्ट्रिक बस पुरविण्याचे सुधारित वेळापत्रक देऊनसुद्धा कंपनीने एकही बस न पुरविल्याने ही कारवाई करण्यात येत असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
एसटी महामंडळाने ‘इव्हे ट्रान्स’ कंपनीला २ नोव्हेंबर २०२३ रोजी इलेक्ट्रिक बस पुरविण्याचे कंत्राट दिले होते. कंपनीकडून महामंडळाला जानेवारी २०२५ पर्यंत १,९३५ बस आणि २४ महिन्यांमध्ये म्हणजे जून २०२६ पर्यंत ५,१५० बस पुरविणे अपेक्षित होते. परंतु, मार्च २०२४ ते मे २०२५ या कालावधीत पुरवठादार कंपनीकडून एसटीला ९ मीटर लांबीच्या १३८ व १२ मीटर लांबीच्या ८२ अशा एकूण २२० बस पुरविण्यात आल्या. मात्र, कराराचा भंग करणाऱ्या कंपनीचे कंत्राट याआधीच रद्द करायला हवे होते, असे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी म्हटले होते. परंतु, असे न करता वेळेत बस न पुरविणाऱ्या कंपनीची प्रलंबित बिलाची काही रक्कम चुकती करण्यात आली होती. या संस्थेचे कंत्राट रद्द करण्यासाठी बरगे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. आता तिचे कंत्राट रद्द करण्यात आले आहे.
‘शिवशाही’चे रूपांतर हिरकणीमध्ये
सध्या एसटी महामंडळाकडे चालनात असलेल्या शिवशाही बसची टप्प्याटप्प्याने पुनर्बांधणी करून त्याचे रूपांतर हिरकणी (निम आराम) बसमध्ये करण्यात यावे.
तसेच या बस पूर्वीप्रमाणे हिरव्या पांढऱ्या रंगातच असाव्यात, असे निर्देश मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिले.