रस्ते अपघातात प्रथम प्रतिसाद देणाऱ्या पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 09:23 IST2025-10-24T09:23:36+5:302025-10-24T09:23:46+5:30
देशभरात अवयवदान सुलभ करण्यासाठी ‘नोटो’चे सर्व राज्यांना निर्देश; समुपदेशनावर विशेष भर

रस्ते अपघातात प्रथम प्रतिसाद देणाऱ्या पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्या
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : प्रत्यारोपणासाठी अवयवांच्या तुटवड्याची गंभीर समस्या लक्षात घेता, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय अवयव आणि उती प्रत्यारोपण संस्थेने (नोटो) सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार, रस्ते अपघातातील मेंदूमृतांचे अवयवदान सुलभ व्हावे यासाठी पोलीस, रुग्णवाहिका चालक, आपत्कालीन वैद्यकीय तंत्रज्ञ आणि पॅरामेडिकल कर्मचारी यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
‘नोटो’ने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना राज्य व जिल्हास्तरावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रशिक्षणात अवयवदान प्रक्रिया, मेंदूमृत्यू ओळखणे, मानक कार्यप्रणाली, तसेच कुटुंबाशी संवाद आणि समुपदेशन यावर विशेष भर देण्यात येईल. प्रशिक्षणासाठी संबंधित प्रादेशिक आणि राज्यस्तरीय अवयव प्रत्यारोपण संस्था मदत करतील.
अनेकांना नवजीवन
राज्य व केंद्रशासित प्रदेशांनी सर्व प्रथम प्रतिसाद देण्याऱ्या व्यक्तींचे प्रशिक्षण पूर्ण करून त्याचा त्रैमासिक अहवाल नोटोला त्यांच्या संबंधित राज्य अवयव व उती प्रत्यारोपण संस्था (सोटो) मार्फत सादर करावा, असे आदेश दिले आहेत. या उपक्रमामुळे देशात अवयवदानाची जागरूकता वाढून हजारो रुग्णांना नवजीवन मिळण्याची आशा आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
प्रत्यारोपणासाठी अवयवांची टंचाई
भारतात प्रत्यारोपणासाठी अवयवांची मोठी टंचाई आहे. हजारो रुग्ण अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. या तुलनेत अवयवदानाचे प्रमाण प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे एक दाता याहून कमी आहे. रस्ते अपघातांतील संभाव्य अवयवदाते वेळेत ओळखले जात नसल्यामुळे आणि आवश्यक कार्यवाही न झाल्यामुळे मौल्यवान अवयव वाया जातात, असे निरीक्षण आहे.
दरवर्षी रस्ते अपघातांमुळे मोठ्या संख्येने मृत्यू होतात. त्यांत प्रामुख्याने तरुण आणि निरोगी व्यक्तींचा समावेश असतो. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या २०२३ च्या अहवालानुसार, सुमारे १.७ लाख व्यक्तींचा रस्ते अपघातांत मृत्यू झाला. त्यांतील अनेक जण संभाव्य अवयवदाते ठरू शकले असते.