दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 08:42 IST2025-08-18T08:41:42+5:302025-08-18T08:42:28+5:30

मुंबईतील विविध ठिकाणी एकूण १०,०५१ जणांवर कारवाई

Traffic police break crores of fines on Dahi Handi day Violation of rules in Mumbai | दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन

दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकांकडून लाखोंच्या हंड्या फोडण्यात येत असताना मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागानेही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध कोट्यवधींच्या ‘दंडाची हंडी’ फोडल्याचे कारवाईतून समोर आले. वाहतूक विभागाने १० हजार ५१ ई-चलन कारवाई करत १ कोटी १३ लाख ५६ हजार २५० रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच सीसीटीव्हीच्या मदतीने अन्य चालकांनाही ई-चलन बजावण्याची प्रक्रिया सुरू असून, हा आकडा आणखी वाढणार असल्याची माहिती वाहतूक विभागाचे सहपोलिस आयुक्त अनिल कुंभारे यांनी दिली.

दहीहंडीच्या उत्सवात बेभान होत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पोलिसांनी कारवाईतून उत्तर दिले आहे. वाहतूक पोलिसांच्या कारवाईत नागरिकांच्या जिवास धोका निर्माण होईल, अशा धोकादायक पद्धतीने भरधाव वेगात वाहन चालविणाऱ्यासह, विनाहेल्मेट, ट्रिपल सीट, नो एन्ट्रीप्रकरणी वाहतूक विभागाने १० हजार ५१ ई-चलनद्वारे कारवाई केली आहे. याद्वारे १ कोटी १३ लाख ५६ हजार २५० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. गेल्या वर्षी वाहतूक विभागाने १३ हजार १४६ चलन बजावत १ कोटी ५ लाखांचा दंड ठोठावला होता.

तिसऱ्या डोळ्याची नजर

सीसीटीव्हीच्या मदतीने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध ई-चलन बजावण्याचे काम सुरू असल्याने हा आकडा आणखीन वाढणार असल्याचे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे. 

दोन वर्षांत ठोठावलेला दंड

वर्ष        ई-चलन       दंड
२०२४    १३,१४६    १,०५,६८,३५०
२०२५    १०,०५१    १,१३,५६,२५०

Web Title: Traffic police break crores of fines on Dahi Handi day Violation of rules in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.