Traffic mapping for commuters traveling by metro route | मेट्रो मार्गावर प्रवास करताना प्रवाशांना करता येणार मॅपिंग
मेट्रो मार्गावर प्रवास करताना प्रवाशांना करता येणार मॅपिंग

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) प्रस्तावित मेट्रो मार्गिकांवर प्रवाशांना सुलभतेने प्रवास करता यावा यासाठी मॅपिंग सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी ट्रॅव्हल प्लॅनर अ‍ॅप्लिकेशन अ‍ॅपही आणण्यात येणार आहे. यामुळे प्रवासाच्या वेळेची बचत होणार आहे. प्रवाशांना प्रवास सुरू आणि प्रवास संपणारे ठिकाण यावर दर्शवले जाईल. या अ‍ॅपमध्ये प्रवाशांना प्रवासाच्या वेळेचे पर्याय उपलब्ध असणार आहेत. परिणामी, प्रवाशांना प्रतीक्षा कमी करावी लागेल आणि प्रवाशांचा प्रवास सुलभ होईल, असे एमएमआरडीएच्या वतीने सांगण्यात आले.
मुंबई आणि मुंबईनजीकच्या भागांत एमएमआरडीएकडून मेट्रोचे जाळे उभारले जाणार आहे. या मेट्रो मार्गिका सुरू झाल्यावर मेट्रो स्थानकांलगत वाहतूककोंडी होऊ नये म्हणून एमएमआरडीएने आधीपासून खबरदारी घेत उपाययोजना राबवणे सुरू केले आहे.
प्रवाशांना ज्या ठिकाणी पोहोचायचे आहे तेथील अंदाजे वेळ आणि प्रवासाची भाडे, पेमेंट गेटवेच्या एकात्मिककरणासह (इंटीग्रेशन) असणार आहे. यामुळे प्रवाशांना रिअल टाइममध्ये प्रवास करण्यास मदत होईल आणि प्रवासासाठीचे वाहतूक पर्याय रिअल टाइम उपलब्ध असणार. त्यामुळे मुंबईकरांना सहज सुलभतेने प्रवास करणे शक्य होणार असल्याचे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर.ए. राजीव यांनी सांगितले.
विकास प्राधिकरणाकडे ओला, उबर यांसारख्या अ‍ॅप बेस्ड वाहतूक कंपन्यांकडून भागीदारीचे प्रस्ताव आले आहेत. या कंपन्या प्रवाशांचे मेट्रो तिकीट बुक करण्यासह प्रवासाचे इतर पर्यायही उपलब्ध करून देणार आहेत. लवकरच याबाबत कार्यवाही होणार आहे. एमएमआरडीएच्या वतीने मुंबई महानगर भागामध्ये वाहतुकीला चालना देण्यासाठी शुक्रवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अ‍ॅप आधारित अर्बन मोबिलिटी सोल्युशनबाबतही या वेळी चर्चा करण्यात आली. मुंबईकरांचा प्रवासातील वेळ आणि मेट्रो स्थानकाजवळील वाहतूककोंडी कशी दूर करता येईल यावर या वेळी चर्चा करण्यात आली.

Web Title: Traffic mapping for commuters traveling by metro route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.