Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 14:59 IST2025-06-18T14:57:52+5:302025-06-18T14:59:12+5:30

Mumbai Traffic: नव्याने सुरू झालेल्या उड्डाणपुलावरील वाहतूक वाढल्याने प्रवास संथ गतीने

Traffic jam in Vikhroli due to lack of planning | Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी

Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी

मुंबई : विक्रोळीतील नवा उड्डाणपूल मागील आठवड्यात वाहतुकीसाठी खुला झाला आहे. परिणामी या पुलावरील वाढती वाहतूक आणि नियोजनाचा अभाव, यामुळे या परिसरात वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे उड्डाणपूल संपल्यानंतर महामार्ग गाठताना वाहतूक संथ गतीने सुरू आहे.

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार विक्रोळी पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र, येथे संभाव्य वाहतूककोंडी टाळण्यासाठी कोणतीही उपाय योजना केल्याचे दिसत नाही. काही ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. कन्नमवार नगरातील ज्या वाहनचालकांना टागोरनगरमध्ये जायचे आहे, त्यांना आधी महामार्गावरील पूल पार केल्यानंतर उजवे वळण घेऊन टागोर नगरात जात येत असे. आता त्यांना विक्रोळी स्थानकाच्या येथे नव्या पुलखालून वळसा घालून जावे लागत आहे.

महामार्गावरील पूल ओलांडल्यानंतर वाहने थेट टागोर नगरात जाऊ नयेत, यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. मात्र, दोन बॅरिकेड्स मधील अंतराचा फायदा घेऊन वाहनचालक तिथे घुसखोरी करू लागले आहेत. त्याचा फटका नव्या पुलावरून येणाऱ्या वाहनांना बसत आहे

रस्ता अरुंद असल्याने परिसरात होते वाहतूककोंडी
उड्डाणपूल खुला झाल्यानंतर पश्चिमेकडून पूर्वेला आल्यानंतर टागोर नगर, पूर्व द्रुतगती महामार्गावर रस्ता अरुंद असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत आहे. वाहतूककोंडी होत असल्यामुळे यावर तोडगा काढण्यात यावा, यासाठी वाहतूक विभाग आणि पालिकेशी वारंवार पत्रव्यवहार केला, मात्र प्रशासनाने या समस्यांना गांभीर्याने घेतले नाही, असा आरोप महाविकास आघाडीचे खासदार संजय पाटील यांनी केला.

विक्रोळीकरांनी केली वाहतूक विभागाकडे तक्रार
- वाहतूककोंडीबाबत विक्रोळीकर विकास मंचाने वाहतूक विभागाकडे तक्रार केली असून, टागोर नगर आणि कन्नमवार नगर या दोन्ही मार्गावर रस्ता दुभाजक लावावा.
- किमान ६ वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नियुक्ती करावी, टागोरनगरला जाणारी वाहतूक रेल्वे स्टेशन मार्गे वळवावी, जड वाहनांना या पुलावरून येण्यास बंदी घालावी.
- नवीन पुलाच्या खाली पूर्व द्रुतगती 3 मार्गावर जाणाऱ्या मार्गिकेवर सिग्नल लावावा, या मागण्या स्थानिक नागरिकांनी आपल्या पत्रात केल्या आहेत.

Web Title: Traffic jam in Vikhroli due to lack of planning