सांगलीतून निघणार 'ट्रॅक्टर मोर्चा', राजू शेट्टीच्या स्वाभीमानीचा आंदोलनात सहभाग

By महेश गलांडे | Published: January 25, 2021 10:41 AM2021-01-25T10:41:06+5:302021-01-25T10:41:53+5:30

किसान सभेच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी आंदोलनाची घोषणा झाली आहे. किसान सभेच्या नेतृत्वाखाली रविवारी सकाळी शेतकऱ्यांचा जथा इगतपुरी तालुक्यातील घाटनदेवी येथून मुंबईसाठी निघाला.

'Tractor Morcha' to leave Sangli, Raju Shetty's Swabhimani's participation in the agitation | सांगलीतून निघणार 'ट्रॅक्टर मोर्चा', राजू शेट्टीच्या स्वाभीमानीचा आंदोलनात सहभाग

सांगलीतून निघणार 'ट्रॅक्टर मोर्चा', राजू शेट्टीच्या स्वाभीमानीचा आंदोलनात सहभाग

Next
ठळक मुद्देसांगलीतील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन सांगलीतून स्वाभीमानी शेतकरी संघटनेचा ट्रॅक्टर मोर्चा कोल्हापूरच्या दिशेने येईल. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने ट्रॅक्टरसह शेतकरी यामध्ये सहभागी होतील

सांगली/मुंबई - किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा रविवारी आझाद मैदान येथे दाखल झाला. विविध वाहनांतून हजारो शेतकरी मुंबईत दाखल झाले असून, सोमवारी जाहीर सभेने शेतकऱ्यांचा मोर्चा राजभवनाच्या दिशेने निघणार आहे. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी शेतकरी आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यापूर्वीच आंदोलनात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे. तर, शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टीसांगलीतून ट्रॅक्टर मोर्चा काढून या आंदोलनात सहभागी होत आहेत. 

किसान सभेच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी आंदोलनाची घोषणा झाली आहे. किसान सभेच्या नेतृत्वाखाली रविवारी सकाळी शेतकऱ्यांचा जथा इगतपुरी तालुक्यातील घाटनदेवी येथून मुंबईसाठी निघाला. अडीच तास चालून कसाऱ्याजवळ त्यांनी पुन्हा गाड्यांमध्ये बसून आपली आगेकूच सुरू केली. १५ हजार शेतकरी कसारा घाट पायी उतरले. त्यानंतर वाहनांतून निघालेल्या आंदोलकांचे कल्याण फाटा, ठाणे शहर व मुंबई शहरात जनतेकडून उत्स्फूर्त स्वागत झाल्याचे किसान सभेच्या नेत्यांनी सांगितले. राज्यातील विविध शेतकरी संघटना या आंदोलनात सहभागी होत असून अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन आहे.  

सांगलीतील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन सांगलीतून स्वाभीमानी शेतकरी संघटनेचा ट्रॅक्टर मोर्चा कोल्हापूरच्या दिशेने येईल. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने ट्रॅक्टरसह शेतकरी यामध्ये सहभागी होतील, असे राजू शेट्टी यानी सांगितलंय. गेल्या जून महिन्यांपासून आम्ही सातत्याने या तिन्ही कृषी कायद्याला विरोध करत आहोत, त्यामुळे कुणाच्या पाठिंब्याची अपेक्षाच आम्ही करत नाहीत, असे म्हणत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची अपेक्षा नसल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलंय. तसेच, विरोधी पक्षांचा आंदोलनातील सहभाग पूर्ण ताकदीनिशी नसल्याने आपण नाराज असल्याचंही शेट्टी म्हणाले. देशभरातून शेतकरी मोठ्या संख्येने व ताकदीने आंदोलनात सहभागी होत आहे, पण विरोधी पक्ष प्रभावीपणे दिसत नाही. 
स्वामीनाथन आयोगानुसार हमी भाव देण्याची, ऊसाला एफआरपी देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. पण, सरकार याकडे लक्ष देत नसून कुणीही मागणी न केलेले कायदे अस्तित्वात आणले आहेत. केवळ, कार्पोरेट उद्योजकांसाठी, अदानी-अंबानींसाठी हे कायदे करण्यात आल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला. 

२० हजार कष्टकरी शहापूरमार्गे मुंबईत

कसारा : महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने नाशिकहून मुंबईकडे लाँग मार्चसाठी आलेल्या शेतकऱ्यांचा जत्था शनिवारी सायंकाळी ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर घाट्नदेवी येथे मुक्कामी होता. रविवारी २० हजार कष्टकरी सकाळी साडेआठ वाजता घाट्नदेवी ते कसारा घाटमार्गे लतीफवाडी हे १२ किलोमीटरचे अंतर पायी येत शहापूर तालुक्यात दाखल झाले. या मोर्चात अखिल भारतीय किसान सभा, सीटू कामगार संघटना, अखिल भारतीय शेतमजूर युनियन, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, डीवायएफआय ही युवक संघटना व एसएफआय ही विद्यार्थी संघटना, शेतकरी, कामगार, शेतमजूर, महिला, युवक व विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

किसान मोर्चावर ड्रोनचा वॉच, मुंबईत कडेकोट बंदोबस्त

प्रजासत्ताक दिनाबरोबर मुंबईत धडकलेल्या किसान मोर्चासाठी मुंबईत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच अतिरिक्त फाैजफाट्यासह ड्रोनच्या मदतीने या मोर्चावर पोलीस लक्ष ठेवून आहेत. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किसान मोर्चा सोमवारी राजभवनावर धडकणार आहे. रविवारी हा मोर्चा नाशिकहून मुंबईत दाखल झाला आहे. आझाद मैदान येथे राज्यभरातून आलेल्या शेतकऱ्यांचा मुक्काम आहे. या परिसरातही पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर १०० अधिकारी ५०० अंमलदारांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात आहे. तसेच एसआरपीएफच्या नऊ तुकड्या त्यांच्या दिमतीला तैनात असून ड्रोनद्वारे सर्व हालचालीवर पोलीस लक्ष ठेवून असणार आहे. तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त ठिकठिकाणी गस्त वाढविण्यात आली आहे. राज्य दहशतवादविरोधी पथकही  घडणाऱ्या सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

Web Title: 'Tractor Morcha' to leave Sangli, Raju Shetty's Swabhimani's participation in the agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.