काम देतो सांगून बोलवलं अन् घेतलं ताब्यात; टोरेस घोटाळा प्रकरणात अभिनेत्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 12:49 IST2025-01-29T12:49:20+5:302025-01-29T12:49:42+5:30

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने टोरेस प्रकरणात युक्रेनियन अभिनेत्याला अटक केली आहे.

Torres Scam After Tausif Riaz now Ukrainian actor arrested by Mumbai Police | काम देतो सांगून बोलवलं अन् घेतलं ताब्यात; टोरेस घोटाळा प्रकरणात अभिनेत्याला अटक

काम देतो सांगून बोलवलं अन् घेतलं ताब्यात; टोरेस घोटाळा प्रकरणात अभिनेत्याला अटक

Torres Scam: मुंबईकरांना  शेकडो कोटींचा गंडा घालणाऱ्या टोरेस कंपनी घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांची धडक कारवाई सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी या प्रकरणात टोरेसची मूळ कंपनी असणाऱ्या प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेडचा सीईओ मोहम्मद तौसिफ रियाझला पुण्याजवळून अटक करण्यात आली. त्यानंतर आता मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी रात्री या प्रकरणातल्या युक्रेनियन मास्टरमाईंडला मदत करणाऱ्या युक्रेनियन अभिनेत्याला अटक केली. आतापर्यंत, सुमारे ९,७०० गुंतवणूकदारांनी पोलिसांशी संपर्क साधून दावा केला आहे की त्यांचे सुमारे १०९ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. भविष्यात ही संख्या आणखी वाढू शकते असंही सांगण्यात येत आहे.

मुंबईतील टोरेस घोटाळ्यात मुंबई पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. टोरेस घोटाळ्याप्रकरणी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने युक्रेनियन अभिनेता आर्मेन अटाइन याला अटक केली. आर्मेनवर हा घोटाळा घडवून आणणाऱ्या युक्रेनियन नागरिकाला मदत केल्याचा आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणातील एकूण अटकेची संख्या सहा झाली आहे. यापूर्वी टोरेस घोटाळ्यातील फरार आरोपी तौसिफ रियाझला पोलिसांनी अटक केली होती. आतापर्यंतच्या तपासात टोरेस कंपनीने मुंबई आणि आसपासचा सहा दुकाने उघडून घोटाळा केल्याचे समोर आलं आहे.

आर्थिक गुन्हे शाखेने वर्सोवा परिसरातून आर्मेन अटाइन (४८) याला अटक केली. जो व्यवसायाने अभिनेता आहे आणि त्याने काही हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. या प्रकरणात अटक झालेला तो सहावा व्यक्ती आहे. तौसिफच्या चौकशीत, आर्मेनचे नाव समोर आले. आर्मेन हा अनेक बॉलिवूड चित्रपटांसह जाहिरातींमध्ये सहायक अभिनेता म्हणून झळकला आहे. तो फिल्मसिटी परिसरात राहतो अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी फिल्मसिटीला जाऊन चौकशीदरम्यान त्याचे खरे नाव आणि फोन नंबर मिळवला आणि तो वर्सोवा येथे भाड्याच्या घरात राहत असल्याचे शोधून काढलं.

पोलिसांनी आर्मेनला पकडण्यासाठी चित्रपटाच्या संस्थेतून बोलत असल्याचे सांगितले आणि त्याला जाळ्यात अडकवलं. तुझ्यासाठी एक काम आहे असं सांगताच तो त्यासाठी तयार झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याला भेटायला बोलावलं आणि तो पोहोचताच त्याला अटक केली. चौकशीत गेल्या १० वर्षांपासून कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय मुंबईत राहत आहे. त्याने काही हिंदी चित्रपटांमध्ये छोट्या अॅक्शन भूमिकाही केल्या आहेत. फसवणूक प्रकरणातील युक्रेनियन आरोपी मुंबईत आले तेव्हा त्यांना मुंबईत मदत करण्याचे काम आर्मेनन केले होते. आर्मेनने त्यांना सर्व प्रकारची मदत केली असे तपासात समोर आलं. तसेच आर्मेननेच सीए अभिषेक गुप्ता आणि तौसिफ यांची युक्रेनियन आरोपींशी ओळख करून दिली होती. त्या बदल्यात त्याला पैसेही मिळाले. तसेच आर्मेन टोरेसच्या दोन महत्त्वाच्या बैठकांना देखील हजर होता. दादरच्या कार्यालयाच्या उद्धाटानवेळीही आर्मेनने उपस्थिती लावली होती.
 

Web Title: Torres Scam After Tausif Riaz now Ukrainian actor arrested by Mumbai Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.