लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूवर प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना पूर्ण टोलमाफी देणारा आदेश शुक्रवारी काढण्यात आला.
इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देणारे धोरण राज्य सरकारने आणले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या धोरणाला २९ एप्रिलला मंजुरी देण्यात आली होती. मात्र, या धोरणासंबंधीचा शासननिर्णय जारी न झाल्याने टोलमाफी लागू झालेली नव्हती. २४ दिवसांनी हा आदेश काढण्यात आला.
इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर राज्य सरकार प्रोत्साहन रक्कम देणार आहे. ही रक्कम राज्य सरकारकडून वाहन उत्पादक कंपन्यांना दिली जाईल आणि वाहन खरेदीवर तेवढी रक्कम कंपन्या कमी आकारतील.
राज्य मार्गांवर काय? : राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या उर्वरित राज्य मार्गांवर ५० टक्के टोलमाफी दिली जाईल, असे आधी सांगण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी काढलेल्या आदेशात या मार्गांवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय हा मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील सुकाणू समितीकडून घेण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
इलेक्ट्रिक वाहनांवर प्रति वाहन कमाल प्रोत्साहन रक्कम
दुचाकी वाहने १० हजार रुपयेतीन चाकी वाहने ३० हजार रुपयेतीन चाकी मालवाहू वाहने ३० हजार रुपयेचारचाकी वाहने (परिवहनेतर) १.५० लाख रुपयेचारचाकी वाहने (परिवहन) २ लाख रुपयेचारचाकी हलकी मालवाहू वाहने १ लाख रुपयेबस (एम ३, एम ४) (राज्य परिवहन उपक्रम एसटीयू) २० लाख रुपये बस (एम ३, एम ४) खासगी राज्य/शहरी परिवहन उपक्रम २० लाख रुपये