एसटी डेपो की दुर्गंधीचे आगार? मुंबई सेंट्रल येथे प्रवेशद्वारावर शौचालयाचे पाणी, फलाटही अस्वच्छ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 12:45 IST2025-10-28T12:44:34+5:302025-10-28T12:45:08+5:30
प्रवाशांना अक्षरशः नाक मुठीत घेऊन बस पकडावी लागत आहे.

एसटी डेपो की दुर्गंधीचे आगार? मुंबई सेंट्रल येथे प्रवेशद्वारावर शौचालयाचे पाणी, फलाटही अस्वच्छ
महेश कोले
मुंबई : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) मुंबई सेंट्रल डेपोच्या प्रवेशद्वारावर शौचालयाचे पाणी ओसंडून वाहात असून, परिसरात सर्वत्र तीव्र दुर्गंधी पसरली आहे. प्रवाशांना अक्षरशः नाक मुठीत घेऊन बस पकडावी लागत आहे.
संपूर्ण डेपो परिसरात दारूच्या आणि पाण्याच्या बाटल्यांचा खच दिसत असून, मुख्य प्रवेशद्वाराजवळच सांडपाणी आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे प्रवाशांसोबतच एसटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. राज्याचे मुख्यालय असलेल्या या डेपोमध्ये परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांचेही कार्यालय आहे. मात्र, डेपोत मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता आहे. 'लोकमत'ने यापूर्वीही या समस्येवर वृत्त प्रसिद्ध केले होते. तक्रारीनंतर तात्पुरती स्वच्छता केली जाते. 'लोकमत'च्या प्रतिनिधीने सोमवारी केलेल्या पाहणीत डेपोत पुन्हा अस्वच्छता आढळली.
कचरा, भंगारचे डबे
आगारातील माहिती व तंत्रज्ञान इमारतीला लागून कचरा साठविण्यासाठी मोठे डबे ठेवले आहेत. परंतु, रोजच्या रोज कचरा उचलला जात नसल्यामुळे हे डबे कचऱ्याने ओसंडून वाहात आहेत. इमारतीच्या मागील बाजूला भंगारही पडल्याचे दिसत आहे. डेपोच्या सभोवताली सांडपाणी आणि दारूच्या बाटल्या तसेच कर्मचारी विश्रांतीगृहाबाहेर प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच होता. डेपोतील कार्यशाळेसह अनेक ठिकाणी पाण्याची डबकी तयार झाली असून, त्यावर डास घोंगावत असल्याचे पाहायला मिळाले.
डासांच्या अळ्या वाढण्याचा धोका
डेपोमध्ये डेंग्यू, मलेरियाच्या डासांच्या अळ्या वाढण्याचा धोका आहे. अशात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या तसेच बस पकडण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे प्रशासन कधी गांभीर्याने लक्ष देणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. डेपोमधल्या कचऱ्याच्या डब्याजवळची परिस्थिती आगर व्यवस्थापकांना कळवल्यावर केवळ तिथली स्वच्छता करण्यात आली. दरम्यान, प्रवासी फलाटावर कचरा आणि घाणीचे चित्र कायम होते.
आम्ही पालिकेला शौचालयाचे पाणी ओव्हरफ्लो झाल्याचे कळवले आहे. त्यांच्याकडून सफाई करून घेण्यात येईल- वैभव कांबळे, आगार व्यवस्थापक, मुंबई सेंट्रल