पोट बिघडलेलं, घरातलं टॉयलेट बिझी, कळ आली अन् १८ मजल्यावरुन पडली व्यक्ती; मुंबईतील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 17:40 IST2025-07-14T17:38:24+5:302025-07-14T17:40:26+5:30
मुंबईच्या वडाळा भागात एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये इमारतीच्या १८ व्या मजल्यावरुन पडून ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पण या घटनेमागचं धक्कादायक कारण समोर आलं आहे.

पोट बिघडलेलं, घरातलं टॉयलेट बिझी, कळ आली अन् १८ मजल्यावरुन पडली व्यक्ती; मुंबईतील धक्कादायक घटना
मुंबईच्या वडाळा भागात एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये इमारतीच्या १८ व्या मजल्यावरुन पडून ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमागचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. संबंधित व्यक्तीचं गेल्या काही दिवसांपासून पोट बिघडलं होतं. रविवारी घरातील टॉयलेटमध्ये दुसरं कुणी गेलेलं असताना या व्यक्तीला कळ आली. घरात एकच टॉयलेट असल्यानं व्यक्तीची नाचक्की झाली. घर इमारतीच्या १८ व्या मजल्यावर असल्यानं नेमकं काय करावं ते सुचलं नाही. व्यक्ती इमारतीच्या लिफ्टच्या बाजूला असलेल्या खुल्या डक्टच्या ठिकाणी मोकळं होण्यासाठी बसली आणि घात झाला. पाय सरकल्यानं व्यक्ती थेट १८ व्या मजल्यावरुन खाली कोसळली आणि जागीच मृत्यू झाला.
वडाळा येथील मातोश्री सदन नावाच्या इमारतीत ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती आपल्या बहिणीसोबत राहते. कोणतंही काम करत नव्हती. घरातील टॉयलेटमध्ये कुणीतरी आधीच असल्यानं लिफ्टच्या बाजूच्या खुल्या डक्टच्या शेजारी मोकळं होण्यासाठी बसलं असताना पाय घसरून हा अपघात घडला. घटनेची वर्दी मिळताच पोलीस पोहोचले आणि अग्निशमन दलाच्या मदतीनं मृतदेह तळ मजल्याच्या डक्टमधून बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी प्रथमदर्शनी अपघाताची नोंद केली असून चौकशी सुरू आहे.