आजचा दिवस १४० कोटी भारतीयांची मान उंचावणारा; मंगलप्रभात लोढा यांनी कार्यकर्त्यांसह साजरा केला जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 21:05 IST2023-08-23T21:03:45+5:302023-08-23T21:05:01+5:30
मंगल प्रभात लोढा यांनी देखील नागरिकांसाठी चांद्रयान ३ च्या सॉफ्ट लँडिंगचे प्रक्षेपण दाखवण्यासाठी मुंबईमधील सर्वात मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

आजचा दिवस १४० कोटी भारतीयांची मान उंचावणारा; मंगलप्रभात लोढा यांनी कार्यकर्त्यांसह साजरा केला जल्लोष
मुंबई: भारताच्या आकांक्षाना नवे आकाश देणारे चांद्रयान ३ आज चंद्रावर उतरले. सर्वच भारतीयांसाठी हा ऐतिहासिक क्षण होता. भारताच्या यशाकडे संपूर्ण जगाच्या नजरा खिळलेल्या होत्या. थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून चांद्रयान ३ ची वाटचाल जगाच्या कानाकोपऱ्यात बघितली जात होती. भारतात देखील एकत्र येऊन नागरिकांनी हा ऐतिहासिक क्षण अनुभवला. महाराष्ट्रात सुद्धा विविध ठिकाणी नागरिकांसाठी चांद्रयान ३ च्या सॉफ्ट लँडिंगचे थेट प्रक्षेपण दाखवणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी देखील नागरिकांसाठी चांद्रयान ३ च्या सॉफ्ट लँडिंगचे प्रक्षेपण दाखवण्यासाठी मुंबईमधील सर्वात मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम पालकमंत्री लोढा यांच्या मलबार हिल मतदारसंघातील वसंतराव नाईक चौक गार्डन ताडदेव सर्कल, मलबार हिल येथे संपन्न झाला. चांद्रयान मोहीम यशस्वी व्हावी यासाठी पालकमंत्री लोढा यांच्या हस्ते परिसरातील मारुती मंदिरात महाआरती देखील करण्यात आली.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व, त्यांनी इस्त्रोच्या वैज्ञानिकांवर दाखवलेला दृढ विश्वास आणि या मोहिमेसाठी झटलेल्या सर्वच लोकांच्या मेहनतीमुळे आज १४० कोटी भारतीयांची मान उंचावणार आहे. चांद्रयान ३ च्या सॉफ्ट लँडिंगचा क्षण अनुभवताना प्रत्येक भारतीयाचा उर अभिमानाने भरून आला असणार हे नक्की. आजचा हा दिवस गणपती, दिवाळी, होळी सर्वच सण एकत्र साजरे केल्यावर मिळेल इतका आनंद देणारा आहे. जगातील महासत्तांना जे जमलं नाही ते आपण साध्य केलं आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा भारत हा पहिला देश ठरला. हे फक्त आणि फक्त आपल्या वैज्ञानिकांच्या निश्चयाने आणि मेहनतीने साध्य झालं आहे", असे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रसंगी बोलताना सांगितले.