सॉरी मम्मी पप्पा... पण त्याला फाशी द्या... ब्लॅकमेलला कंटाळून तरुणाने संपविले आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 11:19 IST2024-12-28T11:18:37+5:302024-12-28T11:19:04+5:30
दहा दिवसांनी तरुणाचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला

सॉरी मम्मी पप्पा... पण त्याला फाशी द्या... ब्लॅकमेलला कंटाळून तरुणाने संपविले आयुष्य
मुंबई : मुलींना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी वडाळा येथील सचिन करंजे (२५) याची पोलिसांनी चौकशी केली तेव्हा तो मित्र तन्मय केणी याचे आधारकार्ड वापरत असल्याने पोलिसांनी त्यालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र तेथून तन्मयने पळ काढला. अखेर, दहा दिवसांनी त्याचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. ‘सॉरी मम्मी पप्पा... पण त्याला शिक्षा झाली पाहिजे. मला अडकवले जात असल्याने आत्महत्या करत आहे.’ असे सुसाईड नोटमध्ये लिहिले असल्याचे म्हटले आहे.
वडाळा प्रतीक्षानगर परिसरात राहणाऱ्या तन्मय केणीचे आधारकार्ड वापरून सचिन मुलींना लॉजवर घेऊन जात होता. त्यानंतर मुलींचे फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल करत होता. पोलिसांनी सचिनला ताब्यात घेतल्यानंतर चौकशी सुरू केली. या प्रकरणात १७ डिसेंबरला तन्मय केणी याला चौकशीसाठी वडाळा पोलिस ठाण्यात बोलावले तसेच त्याचा मोबाइल तपासण्यास सुरुवात केली. याचवेळी तन्मय पोलिस स्टेशन मधून पळून गेला. त्याची हरवल्याची तक्रार नोंदविण्यात आली. २६ तारखेला तन्मय हाताची नस कापलेल्या अवस्थेत सापडला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
माझ्या मुलाला सेक्स रॅकेटमध्ये अडकवण्यात आले आहे. त्याला ब्लॅकमेल करण्यात आले. त्याला कंटाळून आत्महत्या केली आहे. असे कुठल्याच मुलासोबत झाले नाही पाहिजे. ज्याने माझ्या मुलाला फसवले आहे त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे - व्ही. रामचंद्र केणी, मृत मुलाचे वडील