शिक्षक दिन : तिनईकर, सुकथनकर भेटीने आयएएस होण्याचा ध्यास - प्राजक्ता लवंगारे-वर्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 05:29 AM2019-09-05T05:29:34+5:302019-09-05T05:30:08+5:30

टाटा समाज विज्ञान संस्थेतील मनुष्यबळ व्यवस्थापन शाखेचे शिक्षक अभिजीत गंगोपाध्याय यांचा माझ्यावर प्रभाव आहे.

Tinikar, Sukathankar Visiting IAS to be - Privatka Lovangare-Verma | शिक्षक दिन : तिनईकर, सुकथनकर भेटीने आयएएस होण्याचा ध्यास - प्राजक्ता लवंगारे-वर्मा

शिक्षक दिन : तिनईकर, सुकथनकर भेटीने आयएएस होण्याचा ध्यास - प्राजक्ता लवंगारे-वर्मा

googlenewsNext

मुंबई : आमचं कुटुंब सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील राजापूरचं. वडील मुंबई महापालिकेत नोकरीला तर आई बोरिवलीच्या भगवती हॉस्पिटलमध्ये नर्स होती. आम्ही चार बहिणी. लहानपणापासूनच वडिलांनी शिक्षणाची गोडी लावली. माझं उच्चशिक्षण रुपारेल व टाटा समाज विज्ञान संस्थेत झाले. मोठी स्वप्नं बघा त्यासाठी कठोर परिश्रम घेऊन ती स्वप्ने पूर्र्ण करा, अशी वडिलांची शिकवण होती. आई-वडील मोठी प्रेरणा आहेत. मुलीने तहसीलदार, उपजिल्हाधिकारी न होता आयएएसच व्हावं, अशी त्यांची जिद्द होती. वडिलांनी लहानपणीच तिनईकर, सुकथनकर, सुधा भावे या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घालून दिली. आपणही या अधिकाऱ्यांसारखे बनावे ही खूणगाठ मी तेव्हाच निश्चित केली... उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा सांगत होत्या. शिक्षक दिनाच्या निमित्ताने त्यांचे हे मनोगत.

टाटा समाज विज्ञान संस्थेतील मनुष्यबळ व्यवस्थापन शाखेचे शिक्षक अभिजीत गंगोपाध्याय यांचा माझ्यावर प्रभाव आहे. संघटनेच्या वा संस्थेच्या यशापयशात मनुष्यबळाचं महत्त्व किती अनन्यसाधारण आहे हे त्यांनीच सांगितलं. यूपीएससीच्या माझ्या यशात इतिहास शिक्षक घोळेकर यांचे मोठे योगदान राहिले. सरांनी मला अभ्यास कसा करावा, काय वाचावं, नियोजन कसं करावं याचं मार्गदर्शन केलं. सर मला सतत प्रोत्साहित करायचे, असे त्या सांगतात.
माझा आयएएसचा प्रवास सोपा नव्हता. १९९८ मध्ये मी अभ्यास सुरू केला तेव्हा अभ्यास साहित्य उपलब्ध नव्हते. वडिलांबरोबर दिल्लीला जाऊन यूपीएससीचे साहित्य घेऊन आले. सुरुवातीला अपयश आले. मात्र खचून न जाता अभ्यास सुरू ठेवला. मी २००१ मध्ये यश मिळविले. तेव्हा मुख्य परीक्षेत दोन वैकल्पिक विषय असायचे. माझा इंग्रजी साहित्य हा वैकल्पिक विषय होता. इंग्रजी साहित्य विषय घेऊन पास होणाºयांची संख्या कमी असायची. मात्र मला मुख्य परीक्षेत त्या विषयात चांगले गुण मिळाले होते. माझी आयोगाने घेतलेली मुलाखत आजही आठवते. मुलाखतीत ३०० पैकी मला तब्बल २६८ गुण मिळाले. ब्रिटिशांनी सुरू केलेल्या रेल्वेमुळे मुंबई उपनगरांत राहणाºया माझ्यासारख्या कनिष्ठ मध्यमवर्गीय मुलीच्या आयुष्यात कसा बदल झाला, त्यामुळे शिक्षण आणि ज्ञान कसं संपादन करता आलं हे मी प्रामाणिकपणे मुलाखतीत सांगितलं. प्रशासनात आल्यावर अनेक लोकोपयोगी कामे करता आली. वैजापूरमध्ये दुष्काळ निवारणाचे काम, अहमदनगरमधील ग्रामस्वच्छता उपक्रम, धुळे जिल्हाधिकारी असताना तेथे धवलक्रांती व कृषी क्षेत्रात केलेले कार्य आणि सिडकोमध्ये नवी मुंबई विमानतळासाठी स्थानिकांना विश्वासात घेऊन कमी कालावधीत वेगाने केलेलं भूसंपादन ही कामे करता आली. वडील मला नेहमी सांगायचे, ‘ बेटा, आपण आयएएस होऊन प्रशासनात सर्वसामान्यांच्या हितासाठी सकारात्मक योगदान दिले पाहिजे.’ आज मागे वळून पाहताना वडिलांची ती शिकवण प्रामाणिकपणे सत्यात उतरविण्याचा प्रयत्न करीत आहे, याचे मला विशेष समाधान आहे. अडचणी तर प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. त्या अडचणींवर परिश्रमाने मात करुन उत्तुंग यश संपादन करावे व समाजाला भरीव योगदान द्यावे हा संदेश मी या निमित्ताने देते.
 

Web Title: Tinikar, Sukathankar Visiting IAS to be - Privatka Lovangare-Verma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.