जीवंतपणीच ‘शोक संदेश’ वाचण्याची वेळ; दहिसरमधील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 01:49 IST2019-07-25T01:49:00+5:302019-07-25T01:49:15+5:30
व्हॉट्सअॅप आणि फेसबुकचे साईड इफेक्ट्स

जीवंतपणीच ‘शोक संदेश’ वाचण्याची वेळ; दहिसरमधील प्रकार
मुंबई : इंटरनेटमुळे विविध अॅप वापरण्याची सवय तसेच कोणतीही शहानिशा न करता मेसेज फॉरवर्ड करण्याची सवय दहिसरमधील एका व्यक्तीसह त्याच्या कुटुंबाला तापदायक ठरली. जीवंत असूनही त्याच्याच मृत्यूचे शोक संदेश त्याच्या कुटुंबीयांना मिळाल्याने त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
दहिसरच्या काजूपाडा परिसरात रवींद्र दुसंगे (४३) कुटुंबासोबत राहतात. ते मालाडमध्ये त्यांच्या नातेवाइकांना भेटण्यासाठी गेले होते. त्या वेळी त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या मोबाइलवर दुसंगे यांना श्रद्धांजली वाहिल्याचे मेसेज येऊ लागले.
सुरुवातीला त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र नंतर फेसबुकवरदेखील त्यांच्या निधनाची पोस्ट अपलोड करण्यात आली. त्यानंतर मात्र मेसेजचे प्रमाण अधिकच वाढले. त्यामुळे त्यांनी या प्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात लिखित तक्रार दिली असून फेसबुकवर चुकीची माहिती व्हायरल करणाऱ्याच्या नावाचा त्यात उल्लेख करण्यात आला आहे. त्यानुसार दहिसर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र तो त्यांना टाळत असून त्याच्यावर लवकरच गुन्हा दाखल केला जाणार आहे.