Join us  

घरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यूची’ घंटा!; सायंकाळी ६ ते ९ या वेळेत सर्वाधिक अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 10:19 AM

सायंकाळी ६ वाजण्याच्या ठोक्याला रस्ते मार्गाने घरी परतणाऱ्या प्रवाशांसाठी आता अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. राज्यात सायंकाळी ६ ते ९ हा वेळ सर्वाधिक अपघातांचा वेळ ठरला आहे.

- महेश चेमटे

मुंबई : सायंकाळी ६ वाजण्याच्या ठोक्याला रस्ते मार्गाने घरी परतणाऱ्या प्रवाशांसाठी आता अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. राज्यात सायंकाळी ६ ते ९ हा वेळ सर्वाधिक अपघातांचा वेळ ठरला आहे. विशेष म्हणजे २०१७ मध्ये राज्यातील एकूण ३५ हजार ८५३ अपघातांपैकी या तीन तासांत ६ हजार ८३ अपघात झाले आहेत. परिणामी राज्यातील सर्वसामान्यांची घरी जाण्याची वेळ मृत्यूची घंट ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे.

केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नुकताच रस्ते अपघातांविषयी अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालानुसार, राज्यातील सर्व प्रकारच्या रस्त्यांवर सायंकाळी ६ ते ९ या वेळेत सर्वाधिक ६ हजार ८३ अपघात झाले आहेत.  सर्वाधिक कमी अर्थात २ हजार ५५७ अपघात मध्यरात्री ३ ते पहाटे ६ या वेळेत झाले आहेत.

राज्यात ३५ हजार ८५३ अपघतांमध्ये १२ हजार २६४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. २०१६ मध्ये १२ हजार ९३५ अपघाती मृत्यू राज्यात नोंदवण्यात आले होते. विविध अपघातांत २० हजार ४६५ प्रवासी गंभीर जखमी झाले असून ११ हजार ६६३ प्रवासी जखमी झाले आहे. तथापि देशातील रस्ते अपघातांच्या मृत्यूंमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी आहे. पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आहे. 

बेदरकारपणे वाहन चालवल्याने अपघातांना निमंत्रण दिले जाते. सुट्टीच्या काळात मोठ्या संख्येने सर्वसामान्य गावाकडे कूच करतात. केंद्रीय अहवालानुसार मे आणि डिसेंबर महिन्यात राज्यात ६ हजार ५०० हून अधिक अपघात झाले आहे. २०१७ या कॅलेंडर वर्षात सुट्टीच्या काळात अर्थात मे आणि डिसेंबर महिन्यात सर्वाधिक अपघात झाले आहेत. मे महिन्यात ३ हजार ३९५ अपघात झाले असून एक हजार २५० प्रवाशांचा मृत्यू झाला. डिसेंबरमध्ये ३ हजार ३७० अपघात झाले असून १ हजार १९६ प्रवाशांना प्राण गमवावे लागले आहे. 

राज्यातील अपघाताचा आढावा….

वेळ             अपघात (हजारांमध्ये)

६ ते ९ (दिवस)            ३५७४

९ ते १२ (दिवस)         ५१४२

१२ ते १५ (दिवस)       ५३९६

१५ ते १८ (दिवस)        ५६८७

१८ ते २१ (रात्र)            ६०८३

२१ ते ०० (रात्र)            ४३६४

०० ते ३ (रात्र)              ३०५०

०३ ते ०६ (रात्र)            २५५७

....................................................

एकूण                         ३५,८५३

टॅग्स :अपघातमहाराष्ट्र