Join us

कांदिवलीतल्या स्फोटात जखमी झालेल्या तीन महिलांचा मृत्यू; गॅस गळतीनंतरही सिलिंडर ठेवला होता पाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 18:42 IST

कांदिवलीत गेल्या आठड्यात लागलेल्या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला.

Kandivali Fire: गेल्या आठवड्यात कांदिवलीत लागलेल्या आगीत गंभीर जखमी झालेल्या सात जणांपैकी तिघांना रविवारी मृत घोषित करण्यात आले. कांदिवलीच्या मिलिटरी मार्गावरील ‘ईएसआयसी’ रुग्णालयामागील राम किसन मेस्त्री चाळीतील एका गाळ्यात ही घटना घडली होती. स्वयंपाकाच्या गॅसच्या सिलिंडरमधून गळती झाल्याने भीषण आग लागून सात जण होरपळले. गळती होत असलेला गॅस साचून राहिल्याने अचानक भडका उडाला आणि दुर्घटना घडली. 

बुधवार, २४ सप्टेंबर रोजी एका केटरिंग सर्व्हिस किचनमध्ये झालेल्या गॅस स्फोटात सहा महिलांसह सात जण गंभीररित्या भाजले होते. जखमींना तातडीने ऐरोली येथील राष्ट्रीय बर्न्स सेंटर आणि कस्तुरबा रुग्णालयात आणण्यात आले. त्यापैकी तिघांचा रविवारी मृत्यू झाला.मृतांमध्ये रक्षा जोशी (४७) या ८५-९० टक्के भाजल्या होत्या आणि बोरिवलीच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत होत्या. तर नितू गुप्ता (३१) या ८० टक्के भाजल्या होती आणि आणखी एक २८ वर्षीय पूनम या ९० टक्के भाजल्या होत्या. दोघांनाही ऐरोली येथील नॅशनल बर्न्स सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. तर इतर चार जणांची प्रकृती गंभीर आहे.

घटनेच्या दोन दिवस आधी त्या ठिकाणी १०x१२ चौरस फूट दुकानातून केटररचे स्वयंपाकघर सुरु करण्यात आले होते. दुकानाकडे वैध  आवश्यक अग्निशमन परवानग्या आणि स्थानिक वॉर्ड कार्यालय आणि पोलिसांकडून आवश्यक परवानग्याही नव्हत्या. स्वयंपाकघरातील सिलिंडरमधून गॅस गळती सुरु होती. मात्र केटरिंगच्या लोकांनी गॅस सिलिंडर उलटा करून तो पाण्याने भरलेल्या टबमध्ये टाकला आणि काम सुरू ठेवले. बुधवारी गॅस गळती झाल्यानंतर अचानक शॉर्ट सर्कीट झाले आणि ठिगणी उडाली. त्यामुळे भडका उडाला आणि किचनमध्ये असलेले सर्व जण होरपळले.

त्या ठिकाणी तेलाचे डबेही होते. त्यामुळे आगीने आणखी रौद्ररूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवलं आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. विद्युत यंत्रणा व विजेच्या तारांमुळे आग पसरल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.

दरम्यान मृतांमध्ये असलेल्या रक्षा जोशी या गेल्या सहा सात वर्षापासून कॅटरिंगचे काम करत होत्या. घटनेची माहिती मिळताच त्यांच्या दोन्ही मुलांनी घटनास्थळी धाव घेतली. पण पोलिसांनी त्यांना रुग्णालयात जाण्यास सांगितले. दहा दिवसांपूर्वीच रक्षा यांच्या मुलाला एका खासगी कंपनीमध्ये नोकरी लागली होती. आईला मदत करण्याच्या उद्देषाने आणि तिचा भार कमी करण्यासाठी त्याने नोकरीला सुरुवात केली होती. मात्र या स्फोटाने त्यांच्याकडून सर्वच हिरावून घेतलं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Kandivali Blast: Three Women Dead After Gas Leak Incident

Web Summary : Three women died from severe burns sustained in a Kandivali catering kitchen gas explosion. A gas leak, mishandled by staff, led to the fatal incident. The kitchen lacked proper permits, and a short circuit ignited the leaked gas. The fire also injured four others.
टॅग्स :मुंबईअपघातआग