Three vacancies in the State of Law Course for three years; CET's possible schedule for next year | तीन वर्षे विधि अभ्यासक्रमाच्या राज्यात ५८० जागा रिक्त; पुढील वर्षासाठीचे सीईटीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
तीन वर्षे विधि अभ्यासक्रमाच्या राज्यात ५८० जागा रिक्त; पुढील वर्षासाठीचे सीईटीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

मुंबई : राज्यातील १४१ विधि (एलएलबी) महाविद्यालयांत ३ वर्षे विधि अभ्यासक्रमासाठीची प्रवेशप्रक्रिया अखेर संपली असून राज्यात या अभ्यासक्रमाच्या ५८० जागा रिक्त आहेत. मुंबईतील मुंबई विद्यापीठ संलग्न महाविद्यालयातील रिक्त जागांची एकूण संख्या १७१ इतकी आहे. राज्यात विधि ३ वर्षे अभ्यासक्रमाच्या रिक्त असलेल्या जागांमुळे ही प्रवेशप्रक्रिया पूर्ण होण्यास यंदा लेटमार्क लागला. अखेर ही प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्याचे सीईटी सेलने जाहीर केले आहे. इतकेच नाहीतर, पुढील वर्षासाठी विधि ३ वर्षे सीईटीचे संभाव्य वेळापत्रकही सेलकडून जारी करण्यात आले आहे.
राज्यातील ११ अकृषी विद्यापीठांतर्गत १४१ संलग्न महाविद्यालयांत विधि ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा १५,१०० जागा उपलब्ध होत्या. मुंबईतील, मुंबई विद्यापीठाशी संलग्न ५५ महाविद्यालयांत तर एसएनडीटी विद्यापीठाशी संलग्न ४ महाविद्यालयांत मिळून ६,४८० जागा उपलब्ध होत्या. यापैकी २४० जागा एसएनडीटी विद्यापीठात तर मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांत ६,२४० जागा होत्या. मुंबई विद्यापीठानंतर औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विधि ३ वर्षे अभ्यासक्रमाच्या १,०२० जागा उपलब्ध होत्या. त्या सर्व जागा प्रवेशप्रक्रियेअंती भरल्याचे चित्र आहे. सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठात विधिच्या ३,०४० जागा उपलब्ध होत्या. त्यातील २,८९० जागा भरल्या असून १५० जागा रिक्त आहेत.
विधि ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी पुढील प्रवेशाची सीईटी २८ जून २०२० रोजी होणार असून त्यासाठी आॅनलाइन अर्ज भरण्याची सुरुवात १९ मार्चपासून होणार आहे. विद्यार्थ्यांना ६ जूनपर्यंत अर्ज भरण्याची मुदत सीईटी सेलने दिली आहे. १४ जुलै २०२० रोजी या अभ्यासक्रमाच्या सीईटीचा निकाल लागण्याची संभाव्य तारीख सीईटी सेलने दिली आहे. यंदा वेळेवर प्रवेश न घेणे, आवडत्या महाविद्यालयाचा अट्टाहास, प्रमाणपत्रे वेळेत सादर न करणे या कारणास्तव अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी हुकल्यावर पुन्हा नवीन संधीसाठी सीईटी सेलकडे निवेदने द्यावी लागली. त्यामुळे विद्यार्थ्यांचा बराचा गोंधळ उडाला होता.
अखेर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यामुळे प्रवेशप्रक्रियाही लांबली. या पार्श्वभूमीवर विधि ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी पुढील वर्षी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आतापासूनच तयारी करण्याचे आवाहनही सेलकडून करण्यात आले आहे.

विद्यापीठ महाविद्यालय प्रवेश प्रवेश 
संख्या क्षमता
डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर, ८ १,०२० १,०२०
मराठवाडा विद्यापीठ
गोंडवाना विद्यापीठ १ १८० १७३
मुंबई विद्यापीठ ५ ६,२४० ६,०६९
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ७ ६०० ६००
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ ११ ९०० ८०४
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ ८ ९०० ८९२
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ २९ २,०४० २,८९०
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ८ ७८० ७४५
एसएनडीटी विद्यापीठ ४ २४० २४०
सोलापूर विद्यापीठ ३ २४० २४०
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ७ ९६० ८८७
एकूण १४१ १५,१०० १४,५६०

Web Title: Three vacancies in the State of Law Course for three years; CET's possible schedule for next year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.