तीन मेट्रो मार्गांमुळे मेट्रोचे वर्तूळ पूर्ण होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 05:20 AM2019-09-15T05:20:49+5:302019-09-15T05:20:56+5:30

राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या अन्य तीन मेट्रो मार्गांमुळे मुंबई, मीरा-भाईंदर, ठाणे, नवी मुंबई ही शहरे जोडली जाऊन मेट्रोचे वर्तूळ पूर्ण होईल

Three metro routes will complete the metro circle | तीन मेट्रो मार्गांमुळे मेट्रोचे वर्तूळ पूर्ण होणार

तीन मेट्रो मार्गांमुळे मेट्रोचे वर्तूळ पूर्ण होणार

Next

राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या अन्य तीन मेट्रो मार्गांमुळे मुंबई, मीरा-भाईंदर, ठाणे, नवी मुंबई ही शहरे जोडली जाऊन मेट्रोचे वर्तूळ पूर्ण होईल आणि वाहतूककोंडी सुटण्यास मदत होईल. या प्रकल्पांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व राज्य सरकार यासह आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांचे अर्थसाह्य घेण्यासाठीही राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या मेट्रो मार्गांच्या सविस्तर प्रकल्प अहवालास तसेच या प्रकल्पाची प्राधिकरणा मार्फत अंमलबजावणी करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
मीरा-भार्इंदरमधील गायमुख ते शिवाजी चौक हा मेट्रो प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीला १४ लाख ३२ हजार दैनंदिन प्रवासी सीएसएमटी-वडाळा-ठाणे-कासारवडवली-गायमुख-शिवाजी चौक (मीरा रोड) या मार्गाचा वापर करतील, असा अंदाज आहे. वेगाने विकसित होत असलेल्या ठाणे-घोडबंदर परिसरातील वाढत्या नागरीकरणाला या प्रकल्पाचा फायदा होणार आहे.
वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हा मेट्रो प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास व राज्य सरकार यांच्या सहकार्यातून पूर्ण केला जाईल. जागतिक बँक, न्यू डेव्हलपमेंट बँक, जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्था इत्यादी आंतरदेशीय किंवा आंतरराष्ट्रीय संस्थांकडून कर्जसाह्य घेणे या बाबींना मंजुरी देण्यात आली आहे. या मेट्रो मार्गांचा फायदा मुख्यत्वाने मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे पुनर्विकसित होणाऱ्या क्षेत्राला होणार आहे. हा मार्ग घड्याळ गोदी, मुंबई जनरल पोस्ट आॅफिस व मुंबई महानगरपालिका या ऐतिहासिक वारसा इमारतींच्या जवळून, मात्र भूमिगत स्वरूपात जाणार आहे. हे पाहता मुंबई पुरातन वारसा जतन समितीकडून (मुंबई हेरिटेज कॉन्झर्व्हेशन कमिटी) लवकरात लवकर मंजुरी देण्याची शिफारसही मान्य करण्यात आली आहे. वडाळा ते सीएसएमटी मेट्रो प्रकल्प हा मेट्रो मार्ग ४ (वडाळा ते कासारवडवली) आणि ४ अ (कासारवडवली ते गायमुख) यांचा दक्षिणेकडे विस्तारित होणारा भाग आहे. वडाळा ते सीएसएमटी प्रकल्पामुळे मुंबई पोर्ट ट्रस्ट पुनर्विकसित परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. तसेच सीएसएमटी हे थेट ठाणे-घोडबंदर व मीरा-भार्इंदरला जोडले जाणार आहे. त्यासोबत मेट्रो ३ चे सीएसएमटी स्थानक, हार्बर रेल्वेचे शिवडी स्थानक आणि मोनारेलचे भक्ती पार्क स्थानक येथे प्रवाशांना मार्ग अदलाबदल करणे सहज शक्य होणार आहे.


वडाळा ते सीएसएमटी मेट्रो प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, संपूर्ण मेट्रो मार्गिका म्हणजे सीएसएमटी- वडाळा-कासारवडवली-गायमुख या प्रकल्पावर प्रारंभी ११ लाख ६० हजार दैनंदिन प्रवासी या मार्गाचा वापर करतील, असा अंदाज
आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने
मुंबई आणि महानगर प्रदेशामध्ये २० हून अधिक उड्डाणपूल बांधले. वाहतूककोंडी व त्यामुळे होणाºया अपघातांवर त्यामुळे आळा बसला आहे.
त्याचबरोबर, महानगर प्रदेशात रस्ते बांधणी आणि रस्त्यांच्या विकासाची कामेही प्राधिकरणातर्फे राबविण्यात येत आहेत.
तसेच महानगर प्रदेशामध्ये मेट्रोची कामेही सुरू असल्यामुळे महानगर प्रदेशाकडे प्रथमच सरकारतर्फे संपूर्ण विकासाची कामे सुरू असल्याचे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे.
>कल्याण - तळोजा
मेट्रोचा फायदा
कल्याण ते तळोजा या मेट्रो प्रकल्पात प्राधिकरण व राज्य सरकार यांच्यासह सिडको आणि एमआयडीसी यांचाही सहभाग असणार आहे. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या देत असतानाच हा प्रकल्प निकडीचा सार्वजनिक प्रकल्प आणि महत्त्वपूर्ण नागरी वाहतूक प्रकल्प म्हणून घोषित करणे, त्यासोबत आवश्यकतेनुसार विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करणे या बाबींनाही मान्यता देण्यात आली आहे. या मार्गामुळे कल्याण, तळोजा, नवी मुंबई, नवी मुंबई विमानतळ या क्षेत्रातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. मेट्रो ५ ठाणे-भिवंडी-कल्याण, नवी मुंबई मेट्रो मार्ग आणि मेट्रो १२ कल्याण ते तळोजा यांचे एकात्मिकरण करण्याचेही प्रस्तावित असून त्यामुळे प्रवाशांना सुलभ प्रवास करणे शक्य होणार आहे. कल्याण-डोंबिवली या शहरांची वाढती लोकसंख्या आणि आजूबाजूला होणारा विकास, २७ गावांचा विकास आराखडा, कल्याण ग्रोथ सेंटर, कल्याण-डोंबिवली ही शहरे नवी मुंबईला जोडण्याची गरज, त्यासाठी परिवहन सेवांची आवश्यकता या सगळ्या बाबी लक्षात घेऊन हा प्रकल्प आखण्यात आला आहे.

Web Title: Three metro routes will complete the metro circle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.