बुलेट ट्रेन भूसंपादनात साडेतीन कोटींचा अपहार; नायगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 12:07 IST2026-04-10T12:03:16+5:302026-04-10T12:07:05+5:30
जमिनीची बोगस कागदपत्रे करून त्याप्रकरणी अधिकाऱ्यांच्या मदतीने हा घोटाळा झाला

बुलेट ट्रेन भूसंपादनात साडेतीन कोटींचा अपहार; नायगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा: बुलेट ट्रेनसाठी संपादित होणाऱ्या जमिनीत स्वतःची मालकी दाखवून वाटणी पत्राच्या कराराचा भंग करून शासनाचे कोट्यवधी रुपये लाटल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. वसईतील पोमण येथे जमिनीची बोगस कागदपत्रे करून त्याप्रकरणी अधिकाऱ्यांच्या मदतीने हा घोटाळा झालेला आहे. याप्रकरणी नायगाव पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल केला.
पोमण येथील सर्व्हे क्रमांक १६४ हिस्सा क्रमांक १/२ मधील जमिनीवर २०१८ ते २०२२ यादरम्यान रॉयल ॲण्ड हब या कंपनीचे बांधकाम बुलेट ट्रेनकरिता संपादित करण्यात आले होते. या कंपनीचे दोन भागीदार असून, पद्मश्री कल्याणजी गजरा (६०) यांच्या तक्रारीनुसार हरिश भानुशाली याने कराराचा गैरवापर करून स्वतःच्या मालकीचे बोगस दस्तावेज तयार केले. यासाठी विविध अधिकाऱ्यांनी त्याला मदत केली.
गैरव्यवहार कसा केला?
वसई-विरार मनपा तसेच भूमी अभिलेख कार्यालय यात सामील असल्याची माहिती आहे. बोगस घरपट्टी, वीजबिल तसेच अधिकाऱ्यांना जागेची पाहणी करून बोगस दस्तावेज केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. ६,५६७ चौरस फूट जमिनीच्या वाटणी पत्रात कराराचा गैरवापर करून ३ कोटी ५६ लाखांचा हा गैरव्यवहार आहे. कागदपत्रे तपासली असता, आरोपीसह अधिकाऱ्यांनी हा गैरव्यवहार केल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती नायगाव ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय हजारे यांनी दिली.